प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: महाराष्ट्राला व्यसन मुक्तीचा संदेश देणारे आणि सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य झोकून देणारे स्वर्गीय आर. आर. (आबा) पाटील यांच्या तासगाव शहरातील पुतळ्यासमोरच दारूचे दुकान सुरू असल्याने हा प्रकार तातडीने बंद करण्याची मागणी तासगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांनी केली आहे. याबाबत त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली.आर.आर.आबांनी संपूर्ण महाराष्ट्रात व्यसनमुक्तीचा विचार प्रभावीपणे रुजविला.मात्र, त्यांच्याच पुतळ्यासमोर दारूची विक्री आणि मद्यपान करणाऱ्यांचा वावर असल्याचे चित्र अत्यंत खेदजनक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.दारू खरेदी करणारे काहीजण पुतळा परिसरातील कट्ट्यावर बसून मद्यपान करतात. त्यामुळे आबांच्या विचारांचा आणि कार्याचा अवमान होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
*दारू दुकानामुळे वाहतुकीलाही अडथळा*
दारू खरेदीसाठी येणारे ग्राहक मुख्य रस्त्यावरच दुचाकी व चारचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे उभी करीत असल्याने या मार्गावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहतूक पोलिसांवरही अतिरिक्त ताण येत असल्याचे पैलवान यांनी निदर्शनास आणून दिले.
विशेषतः महिला, विद्यार्थिनी आणि सर्वसामान्य नागरिकांना नशेत असलेल्या व्यक्तींच्या त्रासाला तसेच असभ्य वर्तनाला सामोरे जावे लागत असल्याने या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सुशोभीकरणावर पाणी फेरले?
माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून तसेच तासगाव नगरपरिषदेच्या विशेष प्रयत्नातून या परिसरातील अतिक्रमणे हटवून परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आला होता. मात्र, दारूच्या दुकानामुळे परिसराच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे पैलवान यांनी म्हटले आहे.
तासगाव नगरपरिषदेच्या मासिक सभेतही या विषयावर चर्चा करून संबंधित दारूचे दुकान बंद करण्याचा ठराव घेण्याची मागणी करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
‘तातडीने निर्णय घ्या’
सामाजिक वातावरण दूषित होण्यापासून रोखण्यासाठी तसेच भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तहसील प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने दखल घ्यावी. आर. आर. आबांच्या पुतळ्यासमोरील दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांनी केली आहे.आबांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या तासगावात त्यांच्या पुतळ्यासमोरच दारूविक्री सुरू असल्याच्या मुद्द्यावरून आता प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या