प्रतिष्ठा न्यूज/ अक्षय कोठावळे
शिगाव : आजच्या काळात मुलांच्या हातात पुस्तकांपेक्षा मोबाईल अधिक दिसतो. रील्स, गेम्स आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या पिढीत एखादे मूल दिवसाला पाच-सहा तास पुस्तकांत रमते, ही गोष्टच अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी आहे. वाळवा तालुक्यातील शिगाव गावच्या अवघ्या अकरा वर्षांच्या स्वरूप सागर लुगडेने हेच अशक्य वाटणारे वास्तवात उतरवून दाखवले आहे.
पलूस येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या स्वरूपने आतापर्यंत तब्बल ५० हून अधिक पुस्तके वाचून पूर्ण केली आहेत. विशेष म्हणजे केवळ वाचनच नव्हे, तर अनेक पुस्तकांतील प्रसंग, व्यक्तिरेखा आणि संदर्भ त्याला तोंडपाठ आहेत. त्याची स्मरणशक्ती आणि वाचनावरील प्रेम पाहून अनुभवी वाचकही थक्क होतात.
लॉकडाउनच्या काळात लागलेली वाचनाची गोडी आज त्याची जीवनशैली बनली आहे. ऐतिहासिक, प्रेरणादायी आणि संदर्भग्रंथांच्या दुनियेत तो तासन्तास रमतो. श्रीमान योगी, संभाजी, अग्निपंख, झंझावात, रणखैदल, प्रतिपश्चंद्र, लालमहाल, उंबरखिंड, कांचनबारी, शिवनेत्र बहिर्जी यांसारख्या पुस्तकांचे त्याने सखोल वाचन केले आहे. एवढेच नव्हे, तर वाचलेल्या पुस्तकांवर तो स्वतःच्या शब्दांत परीक्षण आणि रसग्रहणही लिहितो.
स्वरूपच्या वाचनप्रवासाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा, शिगाव येथे झाली. आष्टा येथील शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या जनरल लायब्ररीने त्याच्या वाचनाला दिशा दिली. आजही ग्रंथालय हेच त्याचे आवडते ठिकाण आहे.
अभ्यासातही तो तितकाच चमकदार आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे. यंदाच्या वाढदिवसाला कपडे, खेळणी किंवा मोबाईलची मागणी न करता त्याने 'शिवनेत्र बहिर्जी' या पुस्तक संचाची मागणी केली आणि आपल्या वाचनवेडाची वेगळीच ओळख निर्माण केली.
आज मोबाईलच्या पडद्यावर बोटे फिरवणारी पिढी वाढत असताना, पुस्तकांच्या पानांत भविष्य शोधणारा स्वरूप लुगडे हा अपवाद नाही तर समाजासाठी आशेचा किरण आहे. वाचनातून विचार घडतात, विचारातून व्यक्तिमत्त्व घडते आणि व्यक्तिमत्त्वातून समाज घडतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे शिगावचा स्वरूप.
मोबाईलच्या युगात पुस्तकांशी मैत्री करणाऱ्या या चिमुकल्याकडे केवळ शिगाव किंवा वाळवा तालुक्यानेच नव्हे, तर संपूर्ण समाजाने प्रेरणेच्या नजरेने पाहण्याची गरज आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या