प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पिकअप वाहनाला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात मयताची पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते. या घटनेमुळे चिंचणी, वासुंबे तसेच तासगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिंचणी येथील रहिवासी आणि सध्या वासुंबे येथे वास्तव्यास असलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बाबुराव जाधव यांचा मुलगा सागर जाधव (वय अंदाजे ४० वर्षे) हे आपल्या दुचाकीवरून (MH 10 CF 3864) मुलगी हर्षिता हिला घेऊन तासगाव-मणेराजुरी रस्त्यावरील एका शाळेत पत्नी सोनाली जाधव यांना घेण्यासाठी गेले होते.
शाळेतून पत्नीला सोबत घेऊन सागर जाधव हे दुचाकीवरून परत येत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला (MH 09 CA 9478) त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले.
या दुर्घटनेत सागर जाधव आणि त्यांची अवघी सहा वर्षांची मुलगी हर्षिता यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सोनाली जाधव या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. या घटनेची अधिकृत माहिती, जखमी सोनाली जाधव यांची वैद्यकीय स्थिती तसेच पुढील कायदेशीर कार्यवाहीबाबतची माहिती संबंधित यंत्रणेकडून मिळणे बाकी आहे.
जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर
एकाच कुटुंबातील वडील आणि अवघ्या सहा वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सागर जाधव आणि चिमुकली हर्षिता यांच्या मृत्यूची बातमी समजताच चिंचणी व वासुंबे परिसरात शोककळा पसरली. या दुर्दैवी घटनेबद्दल नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या