प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:अंजनी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या तुफानी हाणामारीमुळे संपूर्ण परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.लाठ्याकाठ्यांनी झालेल्या या हाणामारीत दोघेजण गंभीर जखमी असून आणखी काही जण जखमी झाले आहेत.परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच तासगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बळाचा वापर करून जमाव पांगवला.या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.अंजनी ते नागेवाडी मार्गावरील माळरानावर कैलास टोकले यांच्या वाढदिवसा निमित्त बुधवारी सायंकाळी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.सुमारे साडेपाचच्या सुमारास शर्यती सुरू असताना तासगाव आणि मालगाव (ता. मिरज) येथील बैलगाडा मालक व त्यांच्या समर्थकांमध्ये मागील वादाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शाब्दिक चकमक सुरू झाली.काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटातील समर्थक समोरासमोर भिडले.त्यानंतर लाठ्याकाठ्यांनी तुफान हाणामारी सुरू झाली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे शर्यतीच्या मैदानावर एकच गोंधळ उडाला.उपस्थित नागरिक आणि बैलगाडा शौकिनांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली.या मारहाणीत दोघेजण गंभीर जखमी झाले असून आणखी तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.जखमींना त्यांच्या समर्थकांनी प्रथम सावळज येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगली व मिरज येथील रुग्णालयात हलविण्यात आले.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्तासह घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून जमावाला पांगवले.त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.या प्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.दरम्यान,याच दोन गटांमध्ये यापूर्वी जानेवारी महिन्यात अंजनी येथील श्री यल्लम्मा देवी यात्रेनिमित्त झालेल्या बैलगाडा शर्यतीत 'नंबर'वरून जोरदार हाणामारी झाली होती.त्यामुळे बुधवारी झालेल्या राड्यामागे पूर्वीचे वैमनस्यही कारणीभूत असल्याची चर्चा सुरू आहे.तसेच शर्यतीदरम्यान गाडी सोडण्याच्या इशाऱ्यावेळी काही गाड्या पुढे पळविल्याने वाद चिघळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.या घटनेमुळे बैलगाडा शर्यतीतील सुरक्षेचा आणि आयोजकांच्या नियोजनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
आजकाल गावांच्या जत्रा, बैलगाड्या शर्यती किंवा महापुरुषांच्या जयंत्या, मिरवणूका म्हणजे दंगली चे अड्डे बनले आहेत. साध्या साध्या कारणावरुन लोक एकदम हिंसक बनत आहेत. दंगली मारामाऱ्या, खून होत आहेत. समाजातील किंवा लोकांमधील संवेदनशीलता, बंधूंभाव किंवा माणुसकी हरवत चालल्याचे हे लक्षण आहे. ज्या कारणासाठी हे सर्व केले जात आहे त्यातील आनंद कोण घेत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
उत्तर द्याहटवा