तासगाव : तालुक्यात चालू हंगामात अत्यंत कमी पाऊस झाल्याने निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी शेतकरी आणि उपोषणकर्त्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास दि. १ ऑक्टोबर २०२६ पासून तासगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात तालुक्यातील पाऊस, पाणीटंचाई, पिकांची स्थिती आणि पशुधनासमोरील चारा संकट याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. कमी पावसामुळे विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची उपलब्धता कमी झाली असून, अनेक गावांतील तलाव व बंधारे कोरडे पडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
खरीप हंगामातील कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून ज्वारी, हायब्रीड ज्वारी, मका, कडवळ आणि हत्ती गवत यांसारख्या चारा पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे पशुधनासाठी चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून तातडीने चारा डेपो सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. कडधान्य उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्नही प्रभावित झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तासगाव तालुका द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असून पाणीटंचाईचा परिणाम द्राक्ष बागांवरही होत असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. शेततळी भरण्यासाठी पैसे भरूनही विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे अपेक्षित पाणी मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सलग व विनाखंडित वीजपुरवठा करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
वाहून जाणारे पाणी अडवून तालुक्यातील तलाव व बंधारे भरून घेण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कर्नाटकच्या दिशेने वाहून जाणारे उपलब्ध पाणी उचलून तलाव, बंधारे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासोबतच पूरकाळात वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर करून दुष्काळावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी शासकीय योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी आणि नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. खरीप हंगामातील पीक विमा भरपाईमध्ये काही पिकांना भरपाई मिळाली, तर इतर पिकांना मिळाली नसल्याने संबंधित शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी करण्यात आली.
मणेराजुरी मंडलातील द्राक्ष उत्पादकांना पीक विम्याबाबत आलेल्या अडचणींचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्येक गावाच्या पातळीवर आधुनिक हवामान केंद्रे उभारल्यास पर्जन्यमानाच्या अचूक नोंदी उपलब्ध होऊन पीक विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळण्यास मदत होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
पूराचे वाहून जाणारे पाणी तलाव व बंधाऱ्यांमध्ये सोडण्याबाबत शासनाने केलेल्या घोषणेनुसार तासगाव तालुक्यातील कोणत्या गावातील कोणत्या तलाव-बांधाऱ्यात किती पाणी सोडण्यात आले, त्यासाठी किती निधी खर्च झाला आणि पाणी सोडले नसेल तर त्यामागील कारणे काय आहेत, याची सविस्तर माहिती देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढील १५ दिवसांत अपेक्षित पाऊस न झाल्यास तासगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास माजी सैनिक जोतिराम आकाराम जाधव यांचे १४ वे आणि पत्रकार शशिकांत बालसिंग डांगे यांचे सहावे आमरण उपोषण दि. १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या उपोषणात सर्वपक्षीय शेतकरी आणि पीक उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निवेदनावर सुखदेव कदम, जोतिराम जाधव, शशिकांत डांगे, सर्जेराव पाटील, संजय डांगे, मधुकर पाटील, मनोजकुमार पाटील, केशव थोरात, बाबोसा पवार, बबन नागजे, सूर्यकांत पाटील, गोविंद गुरव, भरत थोरात, पंडित पवार, रविकिरण जाधव, शहाजी जाधव, धनाजी जाधव, अंकुश सर्जेराव पाटील यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या