प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : गणेशोत्सवात डी.जे.ला फाटा देत पारंपरिक वाद्यांचा अवलंब करून एकत्रितपणे उत्सव साजरा करणाऱ्या नेहरूनगर येथील नंदीवाले समाजाचा आदर्श तालुक्यातील इतर गावांनी घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी केले.नेहरूनगर येथील नंदीवाले समाजाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर नंदीवाले समाजाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक टकले यांनी सांगितले की, गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा, संस्कृती आणि परंपरा जपण्याचा सण आहे. नेहरूनगर येथील नंदीवाले समाजाने संपूर्ण समाजाला एकत्रित घेऊन पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमातून सामाजिक सलोखा आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन होण्यास मदत होते.या कार्यक्रमास पोलीस कर्मचारी श्रीकांत अभंगे, सचिन कुंभार, बालाजी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र भोसले, रामजी देशमुख, दीपक भोसले, प्रदीप मोकाशी, आर. डी. पाटील, जालिंदर भोसले, वसंत भोसले, भास्कर मोकाशी, रामचंद्र देशमुख, राजाराम देशमुख, रामदास जाधव, बंडू वाघमारे यांच्यासह समाजातील सर्व बांधव व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या