सांगली, दि. १५ : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील काळेवस्ती-गळवेवाडी परिसरात आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी शिवाजी कोंडिबा काळेल (वय ७०, रा. काळेवस्ती, गळवेवाडी, ता. आटपाडी) याला विटा येथील मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. तसेच त्याच्यावर ३ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास १५ महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.
मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर २०२६) हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. हा निकाल सांगली जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत सुनावण्यात आलेला तिसरा फाशीचा निकाल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
खेळत असलेल्या आठ वर्षीय मुलीचे अपहरण
या प्रकरणातील आठ वर्षीय पीडिता आपल्या कुटुंबीयांसह काळेवस्ती, गळवेवाडी येथे राहत होती. ७ जानेवारी २०१८ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ती घराजवळ खेळत असताना आरोपीने तिला अज्ञात कारणासाठी सोबत नेले. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुसऱ्या दिवशी, ८ जानेवारी रोजी सकाळी ११.४५ पूर्वी, काळेवस्ती गळवेवाडी येथील शेतजमिनीतील गट क्रमांक ६३ मधील पडका कोरड्या विहिरीत मुलीचा मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान तिच्या गळ्यावर नायलॉनच्या दोरीने फास बांधलेला असल्याचे निदर्शनास आले.
तपासात आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान आरोपी शिवाजी काळेल याला २६ सप्टेंबर २०१८ रोजी अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
१९ साक्षीदारांची साक्ष ठरली महत्त्वाची
या खटल्यात सरकारी पक्षाने १९ साक्षीदार तपासले. प्रत्यक्ष व परिस्थितीजन्य पुरावे, वैद्यकीय व न्यायवैद्यक अहवाल तसेच अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्ध दोषारोप सिद्ध करण्यात आले.
सरकारी वकील ॲड. आरती महानंद देशपांडे-साटविलकर यांनी या खटल्याची बाजू प्रभावीपणे मांडली. तपास अधिकारी रिटायर्ड पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर डेणे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम काळेल, पोलीस निरीक्षक संतोष पवार तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा आणि ३ लाख ५० हजार रुपयांचा दंड अशी कठोर शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास १५ महिन्यांच्या साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि तिच्या निर्घृण हत्येप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या या कठोर शिक्षेमुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या