मिरज, दि. १६ : सहकार तीर्थ, माजी खासदार स्व. गुलाबराव पाटील यांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळीला बळकटी मिळाली. आमदार, खासदार तसेच सहकार क्षेत्रातील द्रष्टे विचारवंत नेते म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. सहकार आणि राजकीय क्षेत्रात स्वच्छ व निष्कलंक चारित्र्याचा, निःस्वार्थी लोकनेता म्हणून त्यांनी निर्माण केलेला आदर्श आजही प्रेरणादायी आहे. सांगलीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी शहराच्या चौफेर विकासाला दिशा दिली, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र मेथे यांनी केले.
स्व. गुलाबराव पाटील यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त, संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. मेथे पुढे म्हणाले की, “गुलाबराव पाटील यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा त्यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील नेटाने पुढे नेत आहेत. त्यांच्या कार्याला साथ देऊन त्यांचे हात बळकट करणे, हेच स्व. गुलाबराव पाटील यांना खरे अभिवादन ठरेल. तसेच गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे वैभव आणि सामाजिक योगदान वाढविणे हीच त्यांच्या विचारांना खरी आदरांजली आहे.”
यावेळी प्राचार्य डॉ. प्रताप भोसले यांनी स्व. गुलाबराव पाटील यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग उलगडून सांगत त्यांच्या कार्याला अभिवादन केले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कार्यकारी विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील, समन्वयक डॉ. सतिश पाटील यांचे सहकार्य लाभले. यावेळी गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलातील सर्व शाखांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या