प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तालुक्यातील खुजगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या तीन नवीन खोल्यांच्या बांधकामाच्या भूमिपूजनावरून सुरू झालेल्या श्रेयवादाला आता कागदपत्रांचा आधार असून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य शशिकांत जमदाडे यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांना कामासंदर्भात चुकीची अथवा अपुरी माहिती दिल्यामुळेच आमदार रोहित पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका झाली,असा आरोप खुजगावचे ग्रामपंचायत सदस्य नितीन देशमुख यांनी केला आहे.
शाळेच्या तीन खोल्यांच्या बांधकामासाठी डिसेंबर २०२५ मध्येच ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर असून,कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद सांगली यांच्या आदेशाने २० डिसेंबर २०२५ रोजी कामास तांत्रिक मंजुरी देण्यात आली.या मंजुरीचा आदेश क्रमांक जा.क्र./प्राशिवि/आस्था-१२/वशी/२२६६१/२०२५ असा आहे.
देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार,शाळेच्या जुन्या इमारतीच्या निर्लेखनाची प्रक्रिया २४ जुलै २०२४ रोजी पूर्ण झाली होती.त्यापूर्वी १९ जून २०२४ रोजी ग्रामपंचायतीमार्फत तत्कालीन आमदार सुमनताई पाटील यांच्याकडे शाळेच्या कामासाठी मागणीपत्र देण्यात आले होते. त्यानंतर आमदार रोहित पाटील यांनी १५ सप्टेंबर २०२५ रोजी जावक क्रमांक १२६२/२०२५ अन्वये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कामासाठी पाठपुरावा केला होता.मागणीपत्र,निर्लेखन प्रक्रिया,आमदारांचा पाठपुरावा आणि तांत्रिक मंजुरी या सर्व बाबींच्या तारखा व कागदपत्रे उपलब्ध आहेत.त्यामुळे संबंधित कामाची संपूर्ण माहिती न देता गैरसमज निर्माण करणे योग्य नाही.नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य निवडून येण्यापूर्वीच तांत्रिक मंजुरी मिळालेल्या कामाचे श्रेय घेण्यापेक्षा विकासकामाची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी,असे देशमुख यांनी सांगितले.माजी खासदारांना कामाची संपूर्ण माहिती मिळाली असती,तर कदाचित आमदारांवर वैयक्तिक टीका करण्याची परिस्थिती निर्माण झाली नसती, असा दावाही देशमुख यांनी केला. आमच्याकडे आरोप नव्हे,तर मागणीपत्राच्या तारखेपासून तांत्रिक मंजुरीपर्यंतची कागदपत्रे आहेत.त्यामुळे खुजगावच्या जनतेसमोर वस्तुस्थिती स्पष्ट आहे, असे त्यांनी नमूद केले.
पाठपुराव्याला सरपंचांचा दुजोरा
आमदार रोहित पाटील गटाचे ग्रामपंचायत सदस्य नितीन देशमुख यांनी शाळेच्या जुन्या इमारतीच्या निर्लेखनापासून तांत्रिक मंजुरीपर्यंत पाठपुरावा केल्याचा दावा लोकनियुक्त सरपंच नंदकुमार अधिकराव पाटील यांनी भूमिपूजन कार्यक्रमात माजी खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीतच केला होता.त्यामुळे शाळेच्या खोल्यांच्या श्रेयवादाला नवे वळण मिळाले असून,सरपंचांच्या या दाव्याची जोरदार चर्चा आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या