कराड, प्रतिनिधी : वैद्यकीय पदवी व आवश्यक परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळल्याच्या आरोपावरून गजानन हौसिंग सोसायटी येथील एका कथित बोगस डॉक्टरविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कराड पंचायत समिती अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनीता सुरेश थोरात यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. भास्कर बंडू जाधव रा. गजानन हौसिंग सोसायटी, कराड असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन २०१७ मध्ये एका पेशंटने बोगस डॉक्टर भास्कर जाधव याच्याकडून पोट दुखीकरता होमिओपॅथी औषधे घेतली
होती. ते औषध खाल्ल्यापासून त्यांना गंभीर शाररीक व्याधी जडल्या असून त्यांचेवर आजही उपचार सुरू असल्याची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे आली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने शहानिशा करण्यासाठी तालुका स्तरीय बोगस डॉक्टर शोध समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीमध्ये फिर्यादी डॉ. सुनिता थोरात सचिव म्हणून कार्यरत आहेत. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.२० वाजण्याच्या सुमारास डॉ. सुनिता थोरात यांनी गजानन हौसिंग सोसायटीतील सोनहिरा बंगला परिसरात संबंधित बोगस डॉक्टराच्या वैद्यकीय व्यवसायाची तपासणी करता तेथे छापा टाकला. यावेळी आवश्यक वैद्यकीय पदवी व व्यवसाय करण्याची परवानगी नसतानाही संबंधित व्यक्ती वैद्यकीय उपचार करत
असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
तक्रारीनुसार, संबंधित ठिकाणी विविध औषधे, औषधांच्या बाटल्या, क्रीम, प्रिस्क्रिप्शनसदृश कागदपत्रे, व्हिजिटिंग कार्ड, लिफाफे तसेच वैद्यकीय संस्थेशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. त्यामध्ये होमिओपॅथिक औषधे, किडनीच्या आजारावरील औषधांच्या बाटल्या आणि इतर औषधांचाही समावेश असल्याचे अहवालात नमूद आहे. औषधांच्या पॅकिंगवरील माहिती व वैद्यकीय व्यवसायासंदर्भातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्याच्याकडे कोणतीही वैध प्रमाणपत्र नसताना त्याने तो दवाखाना चालवित असून त्याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या