प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : धार्मिक श्रद्धा,ऐतिहासिक परंपरा आणि पारंपरिक आतषबाजीचा थरार अशा उत्साही वातावरणात तालुक्यातील कवठे एकंद येथे ग्रामदैवत श्री सिद्धराज महाराजांचा ऐतिहासिक पालखी सोहळा विजयादशमीच्या दिवशी भक्तिभावाने आणि जल्लोषात पार पडला.श्री सिद्धराज महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर, विविध दारू शोभा मंडळांनी सादर केलेली आकर्षक आतषबाजी आणि दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून आलेल्या भाविकांची गर्दी यामुळे संपूर्ण गावाला यात्रेचे स्वरूप आले होते.यंदाच्या उत्सवात पारंपरिक दारूकामासोबत सामाजिक प्रबोधनाचे देखावेही विशेष आकर्षण ठरले.
मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता आरती झाल्यानंतर श्री सिद्धराज महाराजांच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला.मंदिरातून पालखी बाहेर पडल्यानंतर तासगाव-सांगली रस्त्यावरील मंदिराचे मानकरी पाटील-चव्हाण यांच्या कट्ट्यावर पारंपरिक सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला.त्यानंतर पालखीने पुढील मार्गक्रमण सुरू केले.पारंपरिक धार्मिक विधी आणि महाराजांच्या जयघोषात भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.
*पारंपरिक दारूकामाने दसऱ्याची रंगत वाढवली!
कवठे एकंदच्या ऐतिहासिक दसरा उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या पारंपरिक आतषबाजीने यंदाही उपस्थितांची मने जिंकली.लाकडी शिंगटे,कागदी शिंगटे, रंगीत चक्रे,पंचमुखी,सूर्यपान,झाडे, बुरूज आणि दांडपट्टा अशा पारंपरिक प्रकारांसह आधुनिक फायर शोने उत्सवात रंगत आणली.
महावीर दारू शोभा मंडळाचे लाकडी शिंगटे स्पेशल, सिद्धेश्वरी फायर वर्क्सचा माईन्स व टेल शॉट शो, सिद्धिविनायकचा उगवत्या सूर्याचा देखावा आणि आठ इंची औट-माईन्स शो ही प्रमुख आकर्षणे ठरली.कोरे अड्डा यांच्या पारंपरिक लाकडी शिंगट्यांनीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.श्रीराम फायर वर्क्सच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हेलिकॉप्टरच्या प्रतिकात्मक आतषबाजीद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सिद्धराज फायर वर्क्सच्या रंगीबेरंगी फायर शोसह आकाशतारा क्रीडा व मित्र मंडळ,सूर्यफूल आणि अन्य मंडळांच्या आतषबाजीने उत्सवाची रंगत वाढवली. आकाशात उंच झेपावणारे रंगीत फटाके आणि नयनरम्य रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
*‘भेसळमुक्त भारत’च्या संदेशातून सामाजिक प्रबोधन*
दसरा उत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. ए-वन युवा मंच आणि ईगल फायर वर्क्स यांच्या माध्यमातून ‘कलियुगाचे राम – तुकाराम मुंढे साहेब’ यांच्या कार्यावर आधारित ‘भेसळमुक्त भारत’ हा देखावा सादर करण्यात आला.नयनदीप दारू शोभा मंडळानेही भेसळीविरोधातील संदेशावर आधारित देखाव्याद्वारे सामाजिक प्रबोधन केले.गोल्डन धनगर समाज युवा शक्ती दारू शोभा मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेला ‘पंढरीच्या वारकऱ्यांचा रिंगण सोहळा’ हा धार्मिक आणि सांस्कृतिक देखावा विशेष आकर्षण ठरला. टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष आणि वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेतून महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचे दर्शन घडले.नव्या पिढीला वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी, हा या देखाव्यामागील उद्देश होता.
*विविध मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग*
महावीर, सप्तरंग, हरहर, आकाशदीप, जय हनुमान, अंबिका, गोल्डन, हिंदू-मुस्लीम, आझाद, नेत्रदीप, जय जवान, नवतरुण, शिवशक्ती, अहिंसा, त्रिमूर्ती, सिद्धराज, नवदीप, नयनदीप, अजिंक्यतारा, चर्मकार, शिव शंभू, शिवतेज, पार्श्वनाथ, बसवेश्वर, तिरंगा, फॅन्सी, ईगल, लव-अंकुश, शिवछत्रपती, स्वराज्य, नरवीर उमाजी नाईक आणि आरडीएक्स यांसह विविध दारू शोभा मंडळांनी उत्सवात सहभाग घेतला.मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक दारूकाम आणि विविध फायर शो सादर करत उत्सवाची परंपरा जपली.धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक संदेश यांची सांगड घालणाऱ्या या उपक्रमांमुळे दसरा सोहळ्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले.
*नागाव कवठेतही पारंपरिक आतषबाजी*
कवठे एकंदप्रमाणेच नागाव कवठे येथेही दसरा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्री नागनाथ महाराजांच्या पालखीसमोर कागदी शिंगट्यांची सलामी देण्यात आली. सूर्यपान आणि लाकडी शिंगट्यांच्या आतषबाजीने उत्सवाची रंगत वाढली. आतषबाजी सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी यात्रा कमिटीच्या वतीने वेळेची तसेच दारूकामाची नियमावली निश्चित करण्यात आली होती.
*प्रशासनाच्या सहकार्याने उत्सव शांततेत*
दसरा उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवला. अग्निशमन यंत्रणा आणि आरोग्यसेवा सज्ज ठेवण्यासह आवश्यक खबरदारी घेण्यात आली.तहसीलदार अतुल पाटोळे, तासगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी किरण अवचर, तासगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी विशाल टकले, कवठे एकंद ग्रामपंचायतीचे प्रशासक डी. डी. बेडगे, ग्रामसेवक एन.बी.कांबळे, तलाठी कीर्तीकुमार धस, दोन्ही गावांचे सरपंच,पोलीस पाटील मल्हारी पाटील तसेच तासगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने सहकार्य केले.प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे ऐतिहासिक पालखी सोहळा व आतषबाजीचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.धार्मिक परंपरेचा वारसा जपत सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणारा कवठे एकंदचा ऐतिहासिक दसरा उत्सव भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेला.श्री सिद्धराज महाराजांच्या पालखी दर्शनासाठी झालेली गर्दी आणि पारंपरिक आतषबाजीचा जल्लोष यामुळे यंदाचा दसरा सोहळा संस्मरणीय ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या