मुंबई: एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांना थेट जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. प्रवाशांना स्वच्छ, निरोगी आणि आरोग्यदायी प्रसाधनगृहे उपलब्ध करून देणे ही महामंडळाची मूलभूत जबाबदारी असून, याबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित स्वच्छता आढावा बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे सर्व विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित होते.
एसटी महामंडळाकडून सर्वसामान्य प्रवाशांकडून दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारला जातो. त्यामुळे प्रवाशांना किमान स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ असतील, तर त्याचा थेट परिणाम एसटीच्या प्रतिमेवर होतो. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही, असे सरनाईक यांनी ठणकावून सांगितले.
बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची नियमित तपासणी करावी, स्वच्छतेबाबत सातत्याने जागरूक राहावे आणि संबंधित कंत्राटदारांकडून करारानुसार योग्य प्रकारे स्वच्छता करून घ्यावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. केवळ कंत्राटदारांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, तर आपल्या कार्यक्षेत्रातील स्वच्छतेवर संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
प्रवाशांना स्वच्छ सुविधा देण्यात महामंडळ कमी पडले, तर त्याची जबाबदारी संबंधित विभाग नियंत्रकांवर निश्चित केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
एसटी ही सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासासोबतच स्वच्छ बसस्थानके व आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्रशासनाने स्वच्छतेच्या बाबतीत अधिक संवेदनशीलता दाखवून प्रवाशांना दिलासा द्यावा, असे आवाहनही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या