प्रतिष्ठा न्यूज/ दिपक शिंत्रे
विजयपूर : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या जन्मठेपेच्या कैद्याला तब्बल १२ वर्षांनंतर गांधीचौक पोलिसांच्या अँटी-रॉडी पथकाने अटक केली. बसवराज महालिंगप्पा पाटील (रा. मुधोळ, जि. बागलकोट) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद पोलिस ठाण्यात २३ जून २००९ रोजी गुन्हा क्रमांक ९०/२००९ अन्वये भादंवि कलम ३०२, २०१ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हुनगुंद शहरातील कृषी अधिकारी शिवप्पा संगप्पा गुळप्पनवर यांच्याशी एका महिलेच्या माध्यमातून मैत्री निर्माण करून त्यांना एका ठिकाणी नेण्यात आले. तेथे त्यांच्याकडील पैसे घेऊन कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी करून घेतल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान हनमंत पांडुरंग भजंत्री (रा. बसवनबागेवाडी, जि. विजयपूर) आणि बसवराज महालिंगप्पा पाटील (रा. मुधोळ, जि. बागलकोट) यांना अटक करण्यात आली होती. तपास पूर्ण झाल्यानंतर दोघांविरुद्ध बागलकोट जिल्हा प्रधान व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयीन सुनावणीनंतर दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांना विजयपूर केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आले होते.
दरम्यान, २०१४ मध्ये बसवराज पाटील याला उपचारासाठी विजयपूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २९ ऑगस्ट २०१४ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्याने पहारा देणाऱ्या पोलिसांची नजर चुकवून रुग्णालयातून पलायन केले. याप्रकरणी कारागृह अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गांधीचौक पोलिस ठाण्यात भादंवि कलम २२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर आरोपी तब्बल १२ वर्षे पोलिसांना गुंगारा देत फरार होता. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्याचे निर्देश दिले होते.
आरोपीचा शोध घेण्यासाठी गांधीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप तळकेरी यांच्या नेतृत्वाखाली अँटी-रॉडी पथकाने शोधमोहीम सुरू केली. विविध मार्गांनी तपास केल्यानंतर आरोपी बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील सिद्धसमुद्र गावात राजू पोतदार यांच्या शेतजमिनीवर भाडेतत्त्वावर राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे अँटी-रॉडी पथकाने सिद्धसमुद्र येथे छापा टाकून २५ ऑगस्ट २०२६ रोजी बसवराज महालिंगप्पा पाटील याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
१२ वर्षांपासून फरार असलेल्या जन्मठेपेच्या कैद्याला शोधून अटक करण्यात यश मिळवल्याबद्दल पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी गांधीचौक पोलिस ठाण्याच्या अँटी-रॉडी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या