प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली: सांगली डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, जी. एच. रायसोनी व कल्पना फाउंडेशन यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित महाराष्ट्र राज्य १५ वर्षाखालील खुली व मुलींच्या स्वतंत्र निवड फिडे रेटिंग अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचा थरारक समारोप झाला. दि. ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान रेशीमगाठी सांस्कृतिक हॉल, स्फूर्ती चौक, सांगली येथे ही स्पर्धा पार पडली.
स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून निवड झालेले तब्बल २४९ मुला-मुलींनी सहभाग घेतला. तेलंगणामध्ये होणाऱ्या आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी खुल्या गटातील पाच आणि मुलींच्या गटातील चार खेळाडूंची निवड होणार असून, हे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
मुलींच्या गटात पुण्याची निहिरा कौल हिने विजेतेपद पटकावले. पुण्याची साई पाटील द्वितीय, रायगडची वैघा बैजु तृतीय, मुंबई उपनगरची मारगज प्रिशा चतुर्थ, पुण्याची आदिना मोहन्ति पाचवी, छत्रपती संभाजीनगरची वाघळे भूमिका सहावी, नाशिकची कशिश सनप सातवी, पालघरची मायंका राणा आठवी, बुलढाण्याची परिधी गांधी नववी तर कोल्हापूरची संस्कृती सुतार दहावी ठरली.
खुल्या गटात मुंबई उपनगरचा अर्जुन सिंघ याने विजेतेपद मिळवले. ठाण्याचा अथर्व सोनी द्वितीय, सांगलीचा ११ वर्षीय वरद पाटील तृतीय, पुण्याचा आयान सोमाणी चतुर्थ, पुण्याचा मार्मिक शाह पाचवा, पुण्याचा ओम रामगुडे सहावा, नागपूरचा कुशाग्र पालिवाल सातवा, पुण्याचा केविन माथीयाझगान आठवा, पुण्याचा श्लोक माळी नववा तर सांगलीचा आदित्य चव्हाण दहावा क्रमांक मिळवला.
वरद पाटीलच्या तृतीय क्रमांकामुळे सांगलीच्या बुद्धिबळ क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. अवघ्या ११व्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत वरदने आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली.
बक्षीस वितरण समारंभ माजी न्यायाधीश तथा सांगली जिल्हा सरकारी वकील प्रमोदजी भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्रख्यात बिल्डर सुनील कोकितकर, रिअल इस्टेट व्यावसायिक निहाल महात तसेच सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव चंद्रकांत वळवडे उपस्थित होते.
स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी (रत्नागिरी) व आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर (सांगली) यांनी काम पाहिले. राष्ट्रीय पंच करण परीट (इचलकरंजी), विजयकुमार माने (सांगली), अपर्णा शिंदे (सातारा), यश लोहाना (कराड), रोहित पोळ (इचलकरंजी) तसेच राज्य पंच नाझिया पटेल (मिरज), अनिता भोसले (जांभळी), सुचेता देशपांडे यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या