प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगावच्या विद्यार्थिनींनी एप्रिल महिन्यात झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या बी.एड. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या तब्बल चार विद्यार्थिनींनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवत महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली.कु. सारिका अधिकराव पाटील हिने शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक पटकावत महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला. कु. वनिता बाबुराव तुपे व कु. सुमेधा अशोक सुतार यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत अनुक्रमे सातवा क्रमांक मिळवत महाविद्यालयात संयुक्तपणे द्वितीय क्रमांक पटकावला. तर कु. ऋतुजा संतोषकुमार नलवडे हिने विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत दहावा क्रमांक मिळवत महाविद्यालयात तृतीय क्रमांक मिळवला.या गुणवंत विद्यार्थिनींच्या उल्लेखनीय यशामुळे साळुंखे महिला बी.एड. महाविद्यालयाची शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळे हे यश मिळाल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.गुणवंत विद्यार्थिनींचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, सचिव व संस्थेचे पदाधिकारी, माजी प्राचार्य डॉ. बी. एम. पाटील, डॉ. लक्ष्मी भंडारे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रत्नाकर म्हस्के, डॉ. देवदत्त खजूरकर, डॉ. अर्चना चिखलीकर, प्रा. अंकुश पंडित, प्रा. प्रमोद शेंडगे तसेच प्रशासकीय सेवक संजय कुंभार, हणमंत वाघमारे, सुजाता हजारे, अस्मिता साळी यांनी अभिनंदन केले. तसेच पालक व प्रशिक्षणार्थींनीही गुणवंत विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या