प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध असलेल्या तासगावच्या श्री गणपती पंचायतनाचा २४७ वा ऐतिहासिक रथोत्सव आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत,भक्तिमय वातावरणात आणि अभूतपूर्व उत्साहात पार पडला.‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...’च्या जयघोषाने संपूर्ण तासगाव शहर दुमदुमून गेले.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या रथोत्सवाला विशेष भावनिक किनार लाभली.‘दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी होऊ दे,’असे साकडे पटवर्धन कुटुंब आणि भाविकांनी श्री गणरायाच्या चरणी घातले.रथोत्सवाच्या निमित्ताने शहरातील प्रमुख रस्ते,चौक आणि परिसराला अक्षरशः यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.सकाळपासूनच श्री गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.सांगली जिल्ह्याच्या विविध भागांसह परजिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने भाविक तासगावात दाखल झाले होते.
*राष्ट्रगीत,आरतीनंतर मोरयाच्या गजरात रथोत्सवाला प्रारंभ*
दुपारी १.३० वाजता श्रींची मूर्ती विधिवत भव्य रथावर आणण्यात आली.त्यानंतर राष्ट्रगीत आणि श्री गणेशाची आरती करण्यात आली.आरतीनंतर उपस्थित भाविकांनी एकच जल्लोष करत ‘मोरया... मोरया... गणपती बाप्पा मोरया!’चा जयघोष केला आणि दुपारी १.४३ वाजता ऐतिहासिक रथोत्सवाला प्रारंभ झाला.फुलांनी आणि आकर्षक सजावटीने सजविलेल्या भव्य रथाचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची मोठी गर्दी झाली होती.रथ पुढे सरकत असताना भाविकांनी भक्तिभावाने रथ ओढला.ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून आणि जयघोष करत श्री गणरायाचे स्वागत केले.
ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचे सूर आणि गणरायाच्या जयघोषामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील भाविक रथोत्सवात सहभागी झाले होते. महिलांचीही मोठी उपस्थिती होती.
*दुष्काळाच्या छायेत गणरायाच्या चरणी पावसासाठी साकडे*
यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे.त्यामुळे रथोत्सवाच्या निमित्ताने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा श्री गणरायाच्या चरणी मांडण्यात आल्या.विश्वस्त राजेंद्र पटवर्धन आणि उपस्थित प्रमुख नेत्यांनी दुष्काळाचे संकट टळावे,भरपूर पाऊस पडावा,शिवार हिरवेगार व्हावे आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धी यावी,अशी प्रार्थना केली.रथोत्सवातील भक्तीच्या जल्लोषातही पावसासाठीची ही आर्त हाक भाविकांच्या भावनेला स्पर्शून गेली.
*महादेवांच्या भेटीसाठी गणरायाची स्वारी*
मोठ्या उत्साहात भाविकांनी रथ ओढत श्री काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत नेला.श्री गणपती आपल्या वडिलांच्या,अर्थात श्री महादेवांच्या भेटीसाठी येतात, अशी या रथोत्सवामागील आख्यायिका सांगितली जाते.
काशी विश्वेश्वर मंदिरात रथ पोहोचल्यानंतर विधिवत आरती करण्यात आली.त्यानंतर दीड दिवसांच्या श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले.धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा भाविकांनी रथ ओढत तो श्री गणपती मंदिराकडे आणला.या संपूर्ण सोहळ्यात भाविकांचा उत्साह आणि भक्तिभाव ओसंडून वाहत होता.
*तासगाव झाले गणेशमय*
रथोत्सवामुळे संपूर्ण तासगाव शहर गणेशमय झाले होते. श्री गणपती मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती.विविध ठिकाणी भाविकांसाठी पिण्याचे पाणी,प्रसाद आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
२४७ वर्षांची परंपरा आणि हजारो भाविकांची श्रद्धा यांचा अनोखा संगम रथोत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळाला.
*मान्यवरांची उपस्थिती*
रथोत्सवाला मंत्री शंभूराजे देसाई,आमदार रोहित पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील आणि युवानेते प्रभाकर पाटील यांनी उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेतले तसेच भाविकांना रथोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
*चोख नियोजनामुळे रथोत्सव सुरळीत*
रथोत्सव शांततेत,शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिस कर्मचारी, स्वयंसेवक आणि संबंधित यंत्रणांनी विशेष नियोजन केले होते.मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असूनही रथोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडला.
*२४७ वर्षांची परंपरा श्रद्धेने जपली*
तासगावच्या श्री गणपती पंचायतनाला लाभलेली धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा तब्बल २४७ वर्षांची आहे. काळ बदलला,पिढ्या बदलल्या; मात्र श्री गणरायावरील भाविकांची श्रद्धा आजही कायम आहे,याची प्रचिती यंदाच्या रथोत्सवातून आली.
रथोत्सवाची सांगता झाल्यानंतर विश्वस्त राजेंद्र पटवर्धन, सौ.सितारा पटवर्धन आणि राहुल पटवर्धन यांनी रथोत्सवासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व भाविक भक्तांचे आभार मानले.रथोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे भाविक,नागरिक,पोलिस प्रशासन,नगरपालिका प्रशासन,स्वयंसेवक,विविध मंडळे आणि सर्व संबंधितांचे पटवर्धन कुटुंबीय व श्री गणपती मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...’च्या जयघोषात तासगावचा २४७ वर्षांचा ऐतिहासिक रथोत्सव भक्ती,श्रद्धा,परंपरा आणि उत्साहाची अविस्मरणीय अनुभूती देत संपन्न झाला.दुष्काळाच्या छायेतून सुखाच्या पावसाकडे वाटचाल व्हावी,हीच यंदाच्या रथोत्सवातून गणरायाच्या चरणी घातलेली सामूहिक आर्त हाक ठरली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या