प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : “सरकारच्या विरोधात जायला हिम्मत असावी लागते... ती जिगर माझ्यात आहे,” या माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या आक्रमक वक्तव्याने तासगावच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय ठिणगी पडली आहे.कोणाचेही नाव न घेता केलेल्या या विधानाचा अप्रत्यक्ष रोख आमदार रोहित पाटील यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.सत्तेच्या विरोधात उभे राहण्यासाठी केवळ राजकीय पद किंवा ताकद पुरेशी नसते, तर सरकारला थेट भिडण्याची जिगर आणि जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची तयारी लागते,असा संदेश संजयकाका पाटील यांनी आपल्या वक्तव्यातून दिला.त्यामुळे त्यांच्या या विधानाने तासगावच्या राजकीय समीकरणांमध्ये चर्चेला नवे वळण मिळाले आहे.“तालुक्यातील रस्ते आणि पाण्याचे प्रश्न कुणी सोडवले,हे जनतेला माहिती आहे. त्यांच्या वडिलांपासून आम्ही कामं करतोय ”अशा शब्दांत संजयकाका पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय विरोधकांवर निशाणा साधला.त्यामुळे या वक्तव्याला स्थानिक विकासकामांच्या श्रेयावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाची किनार असल्याचे मानले जात आहे.
तासगाव-कवठेमहांकाळच्या राजकारणात संजयकाका पाटील आणि आमदार रोहित पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष नवीन नाही.विकासकामे, रस्ते,पाणी आणि स्थानिक प्रश्नांवरून दोन्ही बाजूंकडून वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या गेल्या आहेत.त्यामुळे ‘रस्ते-पाणी प्रश्न कुणी सोडवले?’ हा मुद्दा आगामी राजकीय संघर्षात पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, “कोण कोणाच्या मांडीवर बसतंय, इलेक्शनला कुणा-कुणाला पैसे दिले,हे खुलासे अजून करायचे आहेत,” असे खळबळजनक वक्तव्यही संजयकाका पाटील यांनी केले.तसेच जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या कामाचे श्रेयही घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची नवी मालिका सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.विशेष म्हणजे, आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजयकाका पाटील यांनी सरकारविरोधात भूमिका घेण्याची तयारी दर्शवतानाच कर्जमाफी आणि लोडशेडिंगच्या प्रश्नावर लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.त्यामुळे सत्ताधारी पक्षात असतानाही स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.“सरकारच्या विरोधात जायला जिगर लागते” या एका वाक्यापासून सुरू झालेला हा राजकीय सूर आता रस्ते, पाणी, विकासकामांचे श्रेय, निवडणुकीतील आर्थिक व्यवहार आणि नेतृत्वाच्या राजकारणापर्यंत पोहोचला आहे.त्यामुळे तासगावच्या राजकीय पटावर आगामी काळात आरोप-प्रत्यारोपांचा सामना आणखी रंगण्याची शक्यता आहे.दरम्यान,संजयकाका पाटील यांच्या या वक्तव्यावर आमदार रोहित पाटील यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.संजयकाकांच्या आरोपांना रोहित पाटील काय उत्तर देणार? रस्ते-पाणी प्रश्नांच्या कामाचे श्रेय कोणाच्या खात्यात जाणार? यावरून आगामी राजकीय संघर्षाची दिशा ठरण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या