मिरज : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला. मिरज येथील प्रसूतीगृह परिसरातील ‘आस्था बेघर महिला निवारा’ परसबागेत वृक्षारोपण करून गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला.
या अभिनव उपक्रमासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मा. आयुक्त संजिता मोहपात्रा, शहर प्रकल्प अधिकारी मा. स्मृती पाटील तसेच आस्था बेघर महिला निवारा व्यवस्थापिका ज्योती सरवदे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉ. रवींद्र ताटे व आरोग्य अधिकारी सचिन सागावकर उपस्थित होते. यावेळी ‘एक पेड़, गणेशोत्सव के नाम’ असा संदेश देत सर्वांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवून भावी पिढीसाठी निरोगी व प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्याची गरज यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रमुख सुरेखा शेख यांनी केले. या उपक्रमास महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्र व प्रसूतीगृहातील वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आस्था बेघर महिला निवारा परिसरातील महिलांनीही या वृक्षारोपणात उत्स्फूर्त सहभाग घेतला. धार्मिक उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून सर्वत्र कौतुक करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या