प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 2 : बँक ऑफ इंडिया, कडेगाव शाखेच्या बीओआय स्टार सॅलरी प्लस योजनेअंतर्गत दिवंगत जनार्दन नामदेव मोहिते (प्राथमिक शिक्षक, कडेपूर) यांच्या वारसदार तथा पत्नी कांचन जनार्दन मोहिते यांना 75 लाखांचा अपघाती विमा दाव्याचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.सोहोली गावचे प्राथमिक शिक्षक जनार्दन नामदेव मोहिते यांचे अपघाती निधन झाले होते. ते बँक ऑफ इंडिया, कडेगाव शाखेचे बीओआय स्टार सॅलरी प्लस योजनेअंतर्गत पगार खातेधारक होते. बँक ऑफ इंडियामध्ये पगार खाते असल्यास 75 लाख रूपयांचे मोफत अपघाती विमा संरक्षण उपलब्ध आहे. मोहिते यांच्या अपघाती निधनानंतर अगदी कमी दिवसामध्ये बँक ऑफ इंडियाने योजनेतील अपघाती विमा संरक्षण उपलब्ध करून देऊन त्यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला.
धनादेश वितरण कार्यक्रमास बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र नाथ श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा अग्रणी प्रबंधक निखिल सावळे, बीओआय स्टार आरसेटी सांगलीचे संचालक महेश पाटील, विपणन विभाग अधिकारी आकाश दासगुप्ता, बँक ऑफ इंडिया कडेगांव शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक दीपक कुमार तसेच बँकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी बीओआय स्टार सॅलरी प्लस योजनेअंतर्गत उपलब्ध असलेले अपघाती विमा संरक्षण कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत उपयुक्त आणि आधार देणारे असल्याचे सांगितले. अशा योजनांमुळे दुर्दैवी प्रसंगी संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत मिळून त्यांना मोठा दिलासा मिळतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच, बँक ऑफ इंडियाने सामाजिक बांधिलकी जपत अशा योजनांचा अधिकाधिक लाभ पात्र ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या