प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तासगाव आगारातील कारभाराचा एक धक्कादायक नमुना समोर आला आहे.आगारातून अधिकृतपणे लोढे-सावळज मार्गाची गाडी पुकारायची, प्रवाशांना त्याच मार्गाचे तिकीट द्यायचे आणि प्रत्यक्ष प्रवासात मात्र चालकाने परस्पर गाडी दुसऱ्याच मार्गाने वळवायची, असा अजब प्रकार घडला आहे. या मनमानीचा फटका लोढे येथील ज्येष्ठ नागरिक उत्तम पाटील यांच्यासह अन्य दोन प्रवाशांना बसला.विशेष म्हणजे,लोढे येथे जाण्यासाठी तिकीट हातात असतानाही या प्रवाशांना कौलगे येथे उतरवण्यात आले.तेथून तब्बल दोन किलोमीटर पायपीट करून त्यांना लोढे गाठावे लागले. चालकाच्या या वागणुकीमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला असून तासगाव आगारातील नियोजन आणि नियंत्रणाचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे.
सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास तासगाव आगारातून तासगाव-डोंगरसोनी ही गाडी पुकारण्यात आली. त्यावेळी वाहतूक नियंत्रण कक्षातून तासगाव-चिंचणी-लोढे-कौलगे-सावळज असा गाडीचा मार्ग सांगण्यात आला.त्यामुळे लोढे येथे जाणारे ज्येष्ठ नागरिक उत्तम पाटील यांच्यासह अन्य प्रवासी या गाडीत बसले.वाहक होवाळ यांनी त्यांना लोढे गावचे तिकीटही दिले.मात्र,तिकीट देताना ही गाडी सावर्डे मार्गे जाणार असल्याची कोणतीही पूर्वकल्पना प्रवाशांना देण्यात आली नाही.गाडी सावर्डे फाट्यावर आल्यानंतर चालक शिंदे यांनी ती सावर्डे मार्गे वळवली.यावेळी उत्तम पाटील यांनी गाडी लोढे मार्गे जाणार असल्याचे सांगत चालकाला विचारणा केली.मात्र,चालकाने गाडी सावर्डे मार्गेच जाणार असल्याचे सांगत त्यांच्याशी वाद घातला. अखेर उत्तम पाटील यांच्यासह अन्य दोन प्रवाशांना कौलगे येथे उतरवण्यात आले.हातात लोढेचे तिकीट असताना दुसऱ्याच मार्गावर उतरवण्याचा हा प्रकार म्हणजे प्रवाशांच्या सेवेला हरताळ फासण्याचाच प्रकार आहे.विशेष म्हणजे,कौलगे येथे उतरवल्यानंतर या तिन्ही प्रवाशांना दोन किलोमीटर चालत लोढे गाठावे लागले. यानंतर उत्तम पाटील यांनी तासगाव आगारात चौकशी केली असता संबंधित गाडी लोढे मार्गे सावळज-डोंगरसोनी अशीच असल्याचे सांगण्यात आले.मग वाहतूक नियंत्रण कक्षाने अधिकृतपणे पुकारलेला मार्ग आणि आगाराकडून मिळालेली माहिती डावलून चालकाने गाडीचा मार्ग परस्पर का बदलला,असा सवाल उपस्थित होत आहे.या प्रकारातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे डोंगरसोनीहून पुन्हा तासगावकडे येताना याच चालकाने गाडी सावर्डे मार्गे न आणता लोढे-चिंचणी मार्गे आणली. जर गाडीचा मार्ग सावर्डेच होता, तर परतीच्या प्रवासात लोढे-चिंचणी मार्ग का स्वीकारला? आणि गाडी लोढे मार्गे जाणारच होती, तर ज्येष्ठ नागरिकांसह अन्य प्रवाशांना कौलगे येथे का उतरवले? या परस्परविरोधी कृतीमुळे चालकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तासगाव आगारातील काही चालक आणि वाहक एसटी महामंडळाची बस ही आपली खासगी मालमत्ता असल्याच्या थाटात वागत असल्याची प्रवाशांची भावना बनली आहे.वाहतूक नियंत्रण कक्षाने निश्चित केलेला मार्ग, आगाराचे नियोजन आणि प्रवाशांच्या सोयी यांना केराची टोपली दाखवली जात असेल, तर सामान्य प्रवाशांनी दाद मागायची तरी कोणाकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.या प्रकाराबाबत आगारप्रमुख पतंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्थानकप्रमुख माने यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले.मात्र, माने यांनी फोन घेण्याचे टाळल्याने आगार प्रशासनाची भूमिका समजू शकली नाही.आता या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून चालक शिंदे यांच्यावर आगारप्रमुख पतंगे कोणती कारवाई करतात,याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
*चौकट:
परतीला लोढे मार्ग चालतो,मग जाताना का नाही?
या संपूर्ण प्रकारातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे परतीच्या प्रवासाचा! डोंगरसोनीहून तासगावकडे येताना चालक शिंदे यांनी लोढे-चिंचणी मार्गाचा वापर केला.मग जाताना लोढे मार्ग सोडून सावर्डे मार्ग का निवडला? गाडीचा मार्ग बदलण्याचा अधिकार चालकाला कोणी दिला? वाहतूक नियंत्रण कक्षाच्या सूचनेला डावलण्याचे कारण काय? आणि लोढेचे तिकीट काढलेल्या प्रवाशांना कौलगे येथे उतरवण्याची जबाबदारी कोणाची? या प्रश्नांची उत्तरे आगार प्रशासनाने देणे गरजेचे आहे.
'प्रवाशांच्या सेवेसाठी' की प्रवाशांच्या गैरसोयीसाठी?
एसटी महामंडळाचे ब्रीदवाक्य 'प्रवाशांच्या सेवेसाठी' असे असताना तासगाव आगारातील अशा प्रकारांमुळे या ब्रीदवाक्यालाच हरताळ फासला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना तिकीट देऊनही इच्छित गावापासून दूर उतरवले जात असेल आणि त्यांना दोन किलोमीटर पायपीट करावी लागत असेल, तर एसटीच्या सेवेचा उपयोग काय? अशा मनमानीला आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या