मुंबई प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धन, करुणामय जीवनशैली आणि निसर्गाप्रती संवेदनशीलता निर्माण करण्याचा संदेश घेऊन देशभरात सुमारे ७ हजार किलोमीटरची पदयात्रा करणारे २४ वर्षीय आयन बॅनर्जी यांनी मुंबईत विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवून जनजागृती केली. समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम, १२०० हून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद, १५०० हून अधिक बियांचे वाटप आणि ३१ किलोमीटरची एकता पदयात्रा अशा विविध उपक्रमांनी त्यांच्या मुंबईतील प्रवासाला सामाजिक आणि पर्यावरणीय अधिष्ठान प्राप्त झाले.
पश्चिम बंगालमधील सुंदरबन येथून ३ मार्च २०२६ रोजी सुरू झालेली ही 'करुणा पदयात्रा' पूर्णतः स्वतंत्र आणि राजकारणविरहित उपक्रम आहे. पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे, शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन देणे आणि दैनंदिन जीवनात करुणा व दयाळूपणाची भावना रुजवणे हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे. २८ ऑक्टोबर रोजी आयन बॅनर्जी मुंबईत दाखल झाले. कोणाकडूनही आर्थिक मदत न स्वीकारता केवळ संवाद आणि सकारात्मक कृतींच्या माध्यमातून लोकांशी जोडले जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
मुंबईतील या उपक्रमांची सुरुवात ३१ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील कार्टर रोडवर आयोजित समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेने झाली. भामला फाउंडेशन आणि पाल फाउंडेशन यांच्या सहकार्याने दिवाळीनिमित्त ही मोहीम राबविण्यात आली. अभिनेत्री रुहानिका धवन आणि निमरत कौर यांच्यासह शेकडो नागरिक व स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेत समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.
१ नोव्हेंबर रोजी पनवेल येथील फ्री हार्टफुलनेस मेडिटेशन सेंटर अर्थात बाबूजी मेमोरियल आश्रम येथे आयन यांनी कार्यशाळा घेतली. ध्यान, विश्रांती, योग आणि अध्यात्म या विषयांवर आधारित या कार्यशाळेत सहभागी सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
४ नोव्हेंबर रोजी एनएससीसीआय चिल्ड्रन्स कॉम्प्लेक्स येथे त्यांनी सुमारे ५०० मुलांशी संवाद साधला. संचालिका सरिता नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या संस्थेतील अनेक मुले वंचित समुदायांमधील आहेत. मुलांनी या संवादात उत्स्फूर्त सहभाग घेतला. याशिवाय आयटीएम स्किल्स युनिव्हर्सिटी आणि एमएनआर इंटरनॅशनल स्कूल येथेही त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर सत्रे घेतली. विशेषतः वनस्पती-आधारित आहारपद्धती आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याविषयी विद्यार्थ्यांनी कुतूहल व्यक्त केले. या तीन शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आयन यांनी १२०० हून अधिक मुलांपर्यंत पर्यावरण संवर्धनाचा विचार पोहोचविला.
१० नोव्हेंबर रोजी 'द वॉकिंग प्रोजेक्ट'च्या सहकार्याने ३१ किलोमीटरची एकता पदयात्रा आयोजित करण्यात आली. देवनार येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसपासून सुरू झालेली ही पदयात्रा बोरीवलीच्या दिशेने मार्गस्थ झाली. आयन यांनी संपूर्ण ३१ किलोमीटरचे अंतर पायी पूर्ण केले, तर अन्य आठ सहभागी वांद्रे ते अंधेरीदरम्यान सुमारे आठ किलोमीटर चालत त्यांच्यासोबत सहभागी झाले. या पदयात्रेदरम्यान शाश्वत खाद्यपद्धती, सार्वजनिक आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेसह विविध सामाजिक व पर्यावरणीय विषयांवर चर्चा करण्यात आली.
मुंबईतील या संपूर्ण टप्प्यात आयन यांनी १५०० हून अधिक बियांचे वाटप केले. १० नोव्हेंबरपर्यंत त्यांनी पदयात्रेद्वारे सुमारे ५५२० किलोमीटरचे अंतर पूर्ण केले होते. तसेच विविध समुदायांमध्ये १० हजारांहून अधिक सेंद्रिय भाजीपाल्याच्या बियांचे वाटप केले होते.
आयन बॅनर्जी हे २०१९ पासून पूर्णपणे वनस्पती-आधारित आहारपद्धतीचा अवलंब करीत आहेत. त्यांच्या या सामाजिक आणि पर्यावरणीय कार्याची दखल घेत पेटा इंडिया संस्थेने २०२० मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांना 'व्हॉलंटियर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित केले होते.
करुणा पदयात्रेच्या संयोजक अनन्य शर्मा म्हणाल्या, "करुणा पदयात्रेचा उद्देश एका व्यक्तीचे सातत्यपूर्ण प्रयत्न इतरांनाही कृतीशील होण्यासाठी प्रेरित करू शकतात, हे दाखवून देणे हा आहे."
मुंबईतील उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आयन बॅनर्जी यांनी गुजरातच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला आहे. डिसेंबर २०२६ मध्ये या पदयात्रेची सांगता होणार असून, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून पर्यावरण संवर्धन आणि करुणामय जीवनशैलीचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा संकल्प आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या