जत, प्रतिनिधी : राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये रात्री-अपरात्री आपत्कालीन उपचारांसाठी डॉक्टर उपलब्ध ठेवावेत, तसेच अनावश्यक वैद्यकीय तपासण्या आणि रुग्णांच्या आर्थिक पिळवणुकीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी जत तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष सुनील बागडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील काही खासगी रुग्णालयांमध्ये रात्रीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसणे, वेळेत उपचार सुरू न होणे आणि रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात पाठविण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असताना रुग्णांना उपचारांसाठी प्रतीक्षा करावी लागणे गंभीर आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
तसेच काही रुग्णालयांकडून अनावश्यक रक्त तपासण्या, सोनोग्राफी, एक्स-रे, सीटी स्कॅन व एमआरआय करण्यास सांगितले जात असल्याच्या तक्रारींकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
प्रत्येक तालुका स्तरावर सरकारी रुग्णालयांत २४ तास आपत्कालीन सेवा सुरू करावी, खासगी रुग्णालयांतील डॉक्टर व वैद्यकीय सुविधांची नियमित तपासणी करावी, उपचारांचे दर दर्शनी भागात लावावेत, महागड्या तपासण्यांचे कारण स्पष्ट करावे, जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष व राज्यस्तरीय २४ तास हेल्पलाइन सुरू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
दुष्काळग्रस्त व दुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा बळकट कराव्यात, तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष भरारी पथके नेमावीत, अशीही मागणी बागडे यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या