मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बांधकामादरम्यानच्या दुर्घटनेतील जखमींची जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन केली विचारपूस
प्रतिष्ठा न्यूज
मिरज, दि. २१ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथील कमानीच्या बांधकामादरम्यान आज दुपारी अचानक स्लॅब बीम ढासळल्याने मोठी दुर्घटना घडली. कमानीचा आडवा बीम भरत असताना अचानक बीमचा भाग कोसळल्याने त्यावर काम करणारे कामगार खाली पडले. या घटनेत सात कामगार जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आज दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास कमानीच्या आडव्या बीममध्ये काँक्रीट भरण्याचे काम सुरू होते. याचवेळी अचानक स्लॅब बीम ढासळला. बीमचा भाग कोसळताच त्यावर काम करणारे कामगार खाली पडले. काही कामगार मलब्याखाली अडकल्याने घटनास्थळी एकच धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच उपलब्ध जेसीबीच्या मदतीने तातडीने मलबा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. बचाव पथकाने तत्परतेने कार्यवाही करत मलब्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. त्यानंतर जखमी कामगारांना तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या सात कामगारांपैकी पाच जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. तर उर्वरित दोन कामगारांपैकी एका कामगाराच्या मणक्याला दुखापत झाली असून, दुसऱ्या कामगाराच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमी कामगारांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव म्हणाले...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी सांगितले की, कमानीचा आडवा बीम भरत असताना अचानक स्लॅब बीम ढासळला. घटनेनंतर उपलब्ध जेसीबीच्या मदतीने तातडीने मलबा हटवून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. दुर्घटनेतील सात जखमी कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पाच कामगारांना किरकोळ दुखापती झाल्या असून, एका कामगाराच्या मणक्याला दुखापत झाली आहे, तर एका कामगाराच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या घटनेत कोणत्याही कामगाराची जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे रुग्णालय परिसरातील बांधकामाच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. बीम अचानक का ढासळला, बांधकामाची गुणवत्ता आणि बांधकामावेळी आवश्यक सुरक्षा उपाययोजनांची पूर्तता झाली होती का, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. दुर्घटनेचे नेमके कारण संबंधित तपासातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सध्या जखमी कामगारांवर उपचार सुरू असून, प्रशासनाच्या माहितीनुसार या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या