प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:आध्यात्मिक सिंचनामुळे केवळ व्यक्तीचे चारित्र्य घडत नाही, तर संपूर्ण मानवता संपन्न होते. सद्विचारांचे सातत्यपूर्ण सिंचन हेच मानवजातीची खरी जीवनरेषा असून बुद्धीला सद्बुद्धीरूप ठेवण्यासाठी आणि अपराधापासून दूर राहण्यासाठी आध्यात्मिक विचारांचे पोषण आवश्यक आहे," असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले.आडी येथील संजीवन गिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचनात ते बोलत होते. यापूर्वी सकाळी श्री दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंच्या चरणचिन्हांवर अभिषेक करून महाआरती करण्यात आली.सायंकाळी नामजपानंतर आयोजित प्रवचनात महाराजांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून आध्यात्मिक जीवनाचे महत्त्व स्पष्ट केले.
ते म्हणाले, जसे झाडाला फळे येण्यासाठी पाणी आवश्यक असते, तसेच जीवनात सुख-शांतीची फळे मिळविण्यासाठी भक्तीचे सिंचन आवश्यक आहे. अंतःकरण हे एक शेत असून त्यात भक्तिभावाचे पाणी दिल्यासच सद्गुणांची पिके बहरतात. केवळ फळांची अपेक्षा करून चालत नाही; त्यासाठी भक्ती, श्रद्धा आणि साधनेचे सिंचन करावे लागते.वटपौर्णिमेच्या उदाहरणातून त्यांनी सांगितले की, झाडाची पूजा करूनही त्याला पाणी अर्पण केले नाही, तर पूजा अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे सद्धर्मालाही निष्ठा आणि आचरणाचे पाणी मिळाले,तरच तो जीवनात फुलतो.
बेंदूर सणाचे महत्त्व सांगताना त्यांनी बैल आणि गोवंशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन केले. यंत्रयुगातही शेती आणि ग्रामीण जीवनात बैलांचे महत्त्व कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.सद्ग्रंथांतील विचार बुद्धीपर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता असल्याचे सांगताना त्यांनी पाईपलाईनचे उदाहरण दिले. पावसाअभावी जमिनीला जशा भेगा पडतात, त्याचप्रमाणे सद्विचारांचा अभाव असल्यास बुद्धीही दुर्बल बनते. नास्तिक किंवा चुकीच्या विचारांच्या प्रभावामुळे बुद्धी भग्न होऊन दुर्बुद्धी निर्माण होते, त्यामुळे सदैव सद्विचारांचे सिंचन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पूर्वजन्मीच्या पुण्याचे उदाहरण देताना महाराज म्हणाले, काही झाडांना वरून पाणी घातले जात नसले तरी जमिनीखालच्या झऱ्यामुळे ती हिरवीगार राहतात. त्याचप्रमाणे काही व्यक्तींचे जीवन पूर्वसंचित पुण्यामुळे सुखी दिसते. त्याला त्यांनी 'भूमिगत सिंचन' अशी उपमा दिली.ठिबक सिंचनाचे उदाहरण देत धर्माच्या मूळ तत्त्वांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच एका गरीब आईने मुलाला दिलेले वचन पूर्ण करून त्याच्यावर सत्य आणि प्रामाणिकपणाचे संस्कार घडविल्याची कथा सांगत जीवनात शुभ विचारांचे सातत्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.भक्तीमध्ये दृढ विश्वास आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी वडिलांवर विश्वास ठेवून उडी मारणाऱ्या मुलाचे उदाहरण दिले. तसेच दीपस्तंभ एक दिवस बंद राहिला, तर जहाजे भरकटतात; त्याचप्रमाणे सद्विचारांचा दीप जीवनात सतत प्रज्वलित राहिला पाहिजे, असे ते म्हणाले.
"एक क्षणाची दुर्बुद्धी आणि एक चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी बुद्धी सद्विचारांनी सक्षम आणि ठाम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे," असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी हणबरवाडी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सागर ढेंगे (हुपरी), सुधाकर चौगुले (कुन्नूर), सदाशिव वाळके (अकिवाट), केडीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक पाटील, श्रीधर संभाजी पाटील (कुरुंदवाड),रवीराज मधुकर पाटील (तासगाव), बाळासाहेब पाटील (भिवशी), दत्तात्रेय कुंभार (म्हाकवे), अशोक चौगुले (यमगर्णी), आंतरराष्ट्रीय खेळाडू समर्थ कवठे (कागल), शिवाजी पाटील (मिरज) आदी मान्यवर व देणगीदारांचा परमपूज्य परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी आडी, बेनाडी, हणबरवाडी, कोगनोळी, हंचिनाळ, सौंदलगा, म्हाकवे, आणूर यांसह निपाणी, कागल, कोल्हापूर, सांगली, मिरज, बेळगाव, पुणे, मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. प्रवचनानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या