प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : कवठे एकंद गावातील कुर्हाडे वस्ती लगतच्या कासार वाट परिसरात बिबट्याचा वावर आढळल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री या परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर आज वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.वनविभागाचे अधिकारी जाधव यांनी संबंधित ऊस क्षेत्राची पाहणी करून तेथील पाऊलखुणांची तपासणी केली. पाहणीनंतर या ठशा बिबट्याच्याच असल्याची प्राथमिक पुष्टी त्यांनी दिली. त्यानंतर वनविभागाने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या असून परिसरावर विशेष नजर ठेवली जात आहे.या पाहणीवेळी वनविभागाचे जाधव,सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव,कुमार माळी स्थानिक शेतकरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.वनविभागाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.विशेषतःकासार वाट, वाडीवाट,कुर्हाडे वस्ती परिसरातील शेतकरी व नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे शेतात जाणे टाळावे,लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये तसेच कोणालाही बिबट्या दिसल्यास किंवा त्याचा वावर आढळल्यास तात्काळ वनविभाग अथवा ग्रामपंचायतीला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.बिबट्याच्या वावरामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये सावधगिरीचे वातावरण असून, वनविभागाकडून पुढील काही दिवस या भागावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या