प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तालुक्यातील नेहरूनगर येथे चार वर्षांपूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील वादाचा राग मनात धरून गावगुंडांच्या टोळीने एका शेतकऱ्याच्या घरावर मध्यरात्री दगडफेक व तोडफोड करत प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी विकास शिवाजी जाधव (रा. नेहरूनगर) व आकाश सचिन शिंदे (रा. शामराव नगर, सांगली) यांच्यासह १० अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपींसह पाच जणांना पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे.याबाबत सागर प्रकाश ढाणे (रा. नेहरूनगर) यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५, १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३), ३२४(४), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विकास जाधव हा सध्या जम्मू-काश्मीरमध्ये गलाई व्यवसाय करत असून काही दिवसांपूर्वी तो गावी आला होता. रविवारी दुपारपासून पाचवा मैल ते तासगाव कारखाना रस्त्यावरील एका शेतात विकास जाधव,आकाश शिंदे व गावातील काही युवक तसेच सांगलीतील लोक असे सुमारे १० ते १२ जण मद्यपान करत बसले होते.सायंकाळच्या सुमारास किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या टोळीने रस्त्याच्या कडेला उभी असलेली पांढरी कार फोडून उसाच्या शेतात पलटी केल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास ही टोळी दोन गाड्यांमधून नेहरूनगर येथे पोहोचली.ग्रामपंचायत कार्यालया समोरील प्रकाश वसंत ढाणे यांच्या घरासमोर जमलेल्या या टोळीने अचानक दगडफेक सुरू केली.घरासमोर उभ्या असलेल्या दोन मोटरसायकलींची तोडफोड केली तसेच मारुती कारच्या काचा फोडल्या.यानंतर दगड-विटांचा वर्षाव करत घराच्या सर्व बाजूंच्या काचा फोडण्यात आल्या.इतक्यावरच न थांबता आरोपींनी कुऱ्हाडीने घराचा मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत कुटुंबातील सदस्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.जोरदार आवाज ऐकून शेजारील मयूर जाधव व इतर ग्रामस्थ धावत आले.ग्रामस्थ जमा होत असल्याचे पाहताच आरोपींनी गावकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करत घटनास्थळावरून पलायन केले.दरम्यान,दरवाजा व काचा फोडल्याच्या आवाजाने घरातील महिला व लहान मुले घाबरून जागी झाली.घराच्या सर्व खोल्यांमध्ये मोठमोठे दगड,विटा व काचांचा खच पडला होता.सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला.सकाळी पंचनामा करण्यात आला असून मुख्य आरोपीसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणात आरोपींसोबत गावातील काही युवक,चोरट्या वाळू वाहतुकीशी संबंधित लोक तसेच ग्रामपंचायतीतील पदाधिकाऱ्यांशी संबंधित व्यक्ती असल्याचा संशय फिर्यादींनी व्यक्त केला आहे. दरम्यान,काही राजकीय पुढारी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचीही चर्चा गावात रंगली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत अभंगे करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या