प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : प्रोग्रेसिव्ह चेस असोसिएशन, सांगली व राजासाहेब ऑफ मिरज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज संस्थानचे कै. श्रीमंत उमाराजे गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली 'एकदिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा – २०२६' रविवारी (दि. १२ जुलै) मिरजेतील ऐतिहासिक श्री माधवजी देवालय, किल्ला भाग येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
स्पर्धेचे उद्घाटन तसेच बक्षीस वितरण समारंभ मिरज संस्थानचे श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन महाराज (राजासाहेब ऑफ मिरज), युवराज श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज आणि युवराणी श्रीमंत अनुसयाराजे पटवर्धन महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
स्पर्धेत सांगली जिल्ह्यासह विविध भागांतील एकूण १३० बुद्धिबळपटूंनी सहभाग नोंदविला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतींमध्ये रेंदाळ येथील श्रीराज भोसले यांनी ७.५ गुणांसह विजेतेपद पटकाविले. सांगलीच्या आदित्य चव्हाण यांनी उपविजेतेपद मिळविले. त्यानंतर अनुक्रमे आदित्य सावळकर (कोल्हापूर), दिव्या पाटील (जयसिंगपूर), विवान सोनी (इचलकरंजी), अभय भोसले (जांभळी), अनिश गांधी (कोल्हापूर), मुदस्सर पटेल (मिरज), दिशा पाटील (जयसिंगपूर) आणि हित बलदवा (जयसिंगपूर) यांनी पारितोषिके प्राप्त केली.
वयोगटानुसार ७ वर्षांखालील गटात आरव पाटील, ध्रुवा मालगोडकर व रुहाण अत्तार, ९ वर्षांखालील गटात आयुष लोंढे, ह्रियांश कोतवाल व परी पाटील, तर १७ वर्षांखालील गटात वेंकटेश खाडेपाटील, अथर्व पाटोळे व शर्वेदू कुंभार यांनी विशेष प्राविण्य संपादन केले.
विशेष पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू म्हणून बी. एस. नाईक, सदाशिव कदम व सुरेश कुमारमठ, उत्कृष्ट बिगरमानांकित खेळाडू म्हणून सचिन टोकले, उत्कृष्ट सांगली खेळाडू म्हणून सदानंद चोथे, उत्कृष्ट मिरज खेळाडू म्हणून हर्ष धनवडे, उत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून जयश्री पाटील, तर केपीज चेस अकॅडेमी, सांगली यांना सर्वोत्कृष्ट अकॅडमीचा सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी बुद्धिबळ खेळाच्या प्रसार व विकासासाठी उल्लेखनीय योगदानाबद्दल तक्षशिला इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन मा. धनंजय वाघ यांना 'बेस्ट चेस प्रोग्रेसिंग अवॉर्ड' प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेसाठी एकूण ₹५०,००० रुपयांचा बक्षीस निधी ठेवण्यात आला होता. खुला गट, विविध वयोगट (यू-७ ते यू-१७), उत्कृष्ट बिगरमानांकित, ज्येष्ठ, दिव्यांग, उत्कृष्ट सांगली, उत्कृष्ट मिरज, उत्कृष्ट महिला आणि सर्वोत्कृष्ट अकॅडमी या विभागांतील विजेत्यांना रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रोग्रेसिव्ह चेस असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत वळवडे, सचिव अमेय पाटील, खजिनदार सागर साठे तसेच संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मार्गदर्शक यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून करण परीट (इचलकरंजी) यांनी, तर सहपंच म्हणून शाहरुख कुरणे, नाझिया पटेल, पूजा धनवडे व अनिता भोसले यांनी काम पाहिले.
या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील बुद्धिबळ चळवळीला चालना मिळाली असून उदयोन्मुख खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या