पंढरपूर | प्रतिनिधी : प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधातील जनआक्रोश दिवसेंदिवस तीव्र होत असून, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभर या प्रकल्पाला वाढता विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर 'शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती'च्या वतीने शनिवारी (दि. १८ जुलै) पंढरपूर येथे 'सद्बुद्धी दिंडी' काढण्यात आली. मुसळधार पावसाची पर्वा न करता हजारो शेतकरी, वारकरी आणि विविध पक्षांचे नेते या दिंडीत सहभागी झाले. सरकारने हा प्रकल्प तातडीने रद्द करावा, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा आंदोलकांनी दिला.
संतराज पॅलेस येथून सुरू झालेली ही दिंडी विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली. टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष आणि शक्तीपीठ महामार्गाविरोधातील घोषणांनी पंढरपूर परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राजू शेट्टी यांचे सरकारवर गंभीर आरोप
यावेळी बोलताना शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर गंभीर आरोप करत सांगितले की, मुठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी सुमारे २५ हजार एकर जमीन, त्यापैकी जवळपास २० हजार एकर बागायती जमीन या महामार्गासाठी संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा नसून काही आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी राबवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पांडुरंगाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी देऊन हा महामार्ग रद्द करण्याची प्रेरणा द्यावी, अशी भावनिक अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
'जनतेचा विरोध डावलून महामार्ग लादला जात आहे' – जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका करत म्हटले की, जनतेचा तीव्र विरोध असतानाही केवळ कंत्राटदारांच्या आर्थिक हितासाठी हा महामार्ग लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने संपादित करण्याचा प्रयत्न झाल्यास जनता आगामी काळात या सरकारचाच 'शक्तिपात' करेल, असा इशारा त्यांनी दिला.
'अंतर्गत रस्त्यांना निधी नाही, मग हा महामार्ग कोणासाठी?' – सतेज पाटील
आमदार सतेज पाटील यांनीही सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते आणि शेतीचे पाणंद रस्ते खड्ड्यांनी भरलेले असून त्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारकडे निधी नसल्याचे सांगितले जाते. मात्र, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या या न मागितलेल्या महामार्गासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. हा प्रकल्प नेमका कोणाच्या फायद्यासाठी आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भर पावसातही निर्धार कायम
मुसळधार पावसातही आंदोलकांचा उत्साह आणि निर्धार कायम होता. राज्यातील प्रस्तावित महामार्गामुळे बाधित होणाऱ्या १३ जिल्ह्यांतील हजारो शेतकरी, वारकरी आणि नागरिक या दिंडीत सहभागी झाले. शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव कागदावरून आणि प्रत्यक्षात पूर्णपणे रद्द होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार सर्व नेत्यांनी व्यक्त केला.
अनेक नेत्यांची उपस्थिती
या आंदोलनात खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार कैलास पाटील, आमदार अभिजित पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, कॉम्रेड राजन क्षीरसागर, कॉ. गिरीश फोंडे, के. के. पाटील, ॲड दीपक लाड, शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते तसेच विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार
आंदोलनाच्या शेवटी सर्वपक्षीय नेत्यांनी एकमुखाने जाहीर केले की, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचा बळी घेणारा आणि जनतेने नाकारलेला शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही. हा प्रकल्प पूर्णपणे रद्द होईपर्यंत राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक व्यापक आणि तीव्र करण्यात येईल.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या