प्रतिष्ठा न्यूज
दिल्ली (प्रसार माध्यम प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) ने शुक्रवार, २४ जुलै रोजी देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये "एक दिवस – एक मागणी" या घोषवाक्याखाली शांततापूर्ण देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. देशभरातील विद्यार्थी, युवक, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सीजेपीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांद्वारे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, सर्व विद्यार्थी संघटना व सामाजिक संस्थांनी स्थानिक प्रशासनाची आवश्यक परवानगी घेऊन आपल्या-आपल्या जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन आयोजित करावे, तसेच आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे जाहीर वाचन करून जनजागृती करावी, असे नमूद केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांतील दोषींवर कठोर कारवाईचा इशारा देत, अशा प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी विशेष फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करण्यात येतील, अशी घोषणा केली. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मात्र, पंतप्रधानांच्या घोषणेत प्रशासनाच्या जबाबदारीबाबत कोणताही उल्लेख नसल्याचा आरोप करत, कॉकरोच जनता पार्टीने ही भूमिका अपुरी असल्याची टीका केली आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे आता देशभरातील विद्यार्थी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या