प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:महाराष्ट्र शासनाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर' अभियानाला बोरगाव येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवार (दि. २२ जुलै) रोजी मातोश्री हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल ७,६३८ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत नागरिकांच्या अर्ज, दाखले, प्रमाणपत्रे व तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यात आला.मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिराचे अध्यक्षस्थान तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित सुमन आर.आर.आबा पाटील यांनी भूषविले.
यावेळी पालक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ६) समाधान शेंडगे, तहसीलदार कवठेमहांकाळ अर्चना कापसे, तहसीलदार तासगाव अतुल पाटोळे, दोन्ही तालुक्यांतील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.राज्य व केंद्र शासनाच्या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांना जागेवरच लाभ मंजूर करण्यात आले. महसुली सेवा अधिक गतिमान व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने नागरिकांच्या विविध अर्ज आणि तक्रारींचा तत्परतेने निपटारा करण्यात आला.
योजनानिहाय लाभार्थी संख्या
राज्य शासनाच्या योजना – ५,४०१
केंद्र शासनाच्या योजना – १,५८६
जिवंत सातबारा मोहीम – ५४३
इतर लाभ – ५३
महिला शेतकरी सन्मानपत्र – २५
घरकुल योजना – १२
गावठाण स्वामित्व योजना – ९
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना – ९
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशासनाने नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि प्रभावी सेवा देत शासनाच्या लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक तत्परतेने काम करण्याचे आवाहन केले.शिबिराला लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांना नागरिकांचा वाढता विश्वास असल्याचे चित्र दिसून आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या