तासगाव : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सांगली जिल्ह्याच्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, माजी खासदार संजयकाका पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांची मुंबई येथे प्रमुख शिलेदारांसह सदिच्छा भेट घेतल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे समोर येत असून, संजयकाका पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता अधिक जोर मिळू लागला आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर संजयकाका यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे ते राष्ट्रवादीत कायम राहणार की पुन्हा भाजपच्या वाटेवर जाणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मुंबईतील या भेटीनंतर “काका पुन्हा भाजपच्या कमळाकडे?” असा सवाल आता जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादीच्या आदेशानुसार संजयकाका यांनी भाजपसोबत जुळवून घेत जिल्ह्यातील भाजप नेत्यांशी राजकीय समन्वय साधला होता. त्यामुळे दोन्ही पक्षांतील वाढत्या जवळीकीची चर्चा आधीपासूनच सुरू होती. आता प्रदेशाध्यक्षांसोबत झालेल्या भेटीने त्या चर्चांना अधिक खतपाणी मिळाले आहे.संजयकाका पाटील यांचा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांमध्ये मजबूत पकड असल्याने, त्यांनी भाजपमध्ये पुनःप्रवेश केल्यास जिल्ह्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. आगामी राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या