पंढरपूर | प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष एनडीएमध्ये जाणार असल्याच्या सर्व चर्चांना स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे. "एनडीएकडून आम्हाला कोणतेही निमंत्रण आलेले नाही. त्यामुळे तिकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांमधून आमची केवळ करमणूक होत आहे," असे ते पंढरपूर दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जयंत पाटील यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' निवासस्थानी त्यांनी घेतलेली भेट, तसेच त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेली चर्चा यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही ठिकाणी जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या.
या सर्व चर्चांचे खंडन करत जयंत पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांची भेट ही पूर्णपणे त्यांच्या मतदारसंघातील इस्लामपूर नगरपालिकेच्या स्थानिक प्रशासकीय प्रश्नासंदर्भात होती. इस्लामपूरच्या नगराध्यक्षांना चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरविण्यात आल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठीच आपण भेट घेतली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, त्या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जयंत पाटील यांनी पक्षातील सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकारी हे शरद पवार यांच्या नेतृत्वामागे ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चार केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप किंवा एनडीएमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या