प्रतिष्ठा न्यूज
पुणे | प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या समाजवादी, पुरोगामी आणि गांधीवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते, 'युवक क्रांती दल' (युक्रांद)चे संस्थापक, माजी आमदार तसेच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांचे रविवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मधुमेहाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील एरंडवणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा कबीर सप्तर्षी इंग्लंडहून पुण्यात आल्यानंतर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत कोथरूड येथील गांधी भवनमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडेल.
डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजवादी विचार, गांधीवाद, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक न्यायासाठी सातत्याने कार्य केले. विद्यार्थी जीवनापासूनच विविध सामाजिक चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि लोकहितासाठीची भूमिका यामुळे त्यांनी राज्याच्या सार्वजनिक जीवनात वेगळी ओळख निर्माण केली.
१९७७ मध्ये चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. आमदार म्हणून तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावत लोकाभिमुख नेतृत्वाचा ठसा उमटवला.
त्यांच्या निधनानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. आमदार रोहित पवार यांनीही सामाजिक माध्यमांद्वारे श्रद्धांजली वाहत, डॉ. सप्तर्षी यांनी गांधीवादी विचार, सामाजिक समता आणि मानवतेच्या मूल्यांसाठी केलेले कार्य कायम प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत त्यांना आदरांजली अर्पण केली.
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्रातील समाजवादी आणि पुरोगामी चळवळीतील एक अभ्यासू, निर्भीड आणि तत्त्वनिष्ठ नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असून, त्यांच्या वैचारिक आणि सामाजिक योगदानाची उणीव दीर्घकाळ जाणवत राहील.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या