कोल्हापूर :: श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने "तरुण मन समजून घेऊया" या विषयावरील विशेष व्याख्यान उत्साहात पार पडले. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिरीष शितोळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ए. बी. बलुगडे यांनी केले. आपल्या मार्गदर्शनात डॉ. शिरीष शितोळे यांनी आजच्या तरुण पिढीची मानसिकता, बदलती जीवनशैली, सामाजिक परिस्थिती आणि त्यातून निर्माण होणारी आव्हाने यांचा सखोल वेध घेतला. तसेच सकारात्मक विचार, मानसिक संतुलन आणि आनंदी जीवनासाठी आवश्यक असलेल्या 'हॅपिनेस फॉर्म्युला' विषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी आजच्या तरुणांनी बदलत्या काळातील घटना आणि प्रसंगांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित केली. व्यक्तिमत्त्व विकासासोबत मानसिक स्वास्थ्य जपणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाला श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. मानसिंग बोंद्रे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
कार्यक्रमास डॉ. के. एम. देसाई (स्टाफ सेक्रेटरी), डॉ. डी. के. वळवी (मराठी विभागप्रमुख), रवींद्र भोसले (प्रबंधक), मनीष भोसले (अधीक्षक) यांच्यासह महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. पी. पी. भाटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. डी. के. वळवी यांनी मानले. व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या