प्रतिष्ठा न्यूज /अक्षय कोठावळे
हातकणंगले : तालुक्यातील मजले गावात शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'जलजीवन मिशन' योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. वारणा नदीवरून सुमारे ४ कोटी ९२ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना सुरू होताच अडचणीत सापडली असून, मुख्य जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्याने गेल्या महिनाभरापासून गावाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, उपसा केंद्रापासून शुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या मुख्य पाईपलाईनला ४० ते ५० ठिकाणी गळती लागली आहे. परिणामी संपूर्ण यंत्रणा कोलमडली असून, ऐन पावसाळ्यातही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. महिलांसह ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या निकृष्ट कामामुळे दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागत असून, त्याचा आर्थिक बोजा स्थानिक ग्रामपंचायतीवर पडत असल्याचेही सांगण्यात येत आहे. याबाबत ठेकेदार तसेच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता, तालुका अभियंता आणि संबंधित लोकप्रतिनिधींवरही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या योजनेची गुणवत्ता तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास प्रशासन आणि संबंधित विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या