प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : विद्यार्थ्यांना पावसाळा ऋतूचे महत्त्व, त्याची वैशिष्ट्ये तसेच पावसाळ्यातील जीवनशैलीची माहिती व्हावी या उद्देशाने MTDK खाडे शैक्षणिक संकुल येथे 'मान्सून दिवस' उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक वेशभूषा, शैक्षणिक सादरीकरणे आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमधून पावसाळ्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरणाबाबत जागरूकता आणि ऋतूंचे वैज्ञानिक महत्त्व समजून घेण्यास अशा उपक्रमांचा निश्चितच सकारात्मक लाभ होईल, असा विश्वास संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांनी व्यक्त केला. शिक्षणासोबतच अनुभवाधारित आणि कृतीप्रधान उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पावसाळा ऋतू, त्यातील पौष्टिक खानपान, वापरले जाणारे कपडे, हंगामी फळे, विविध पक्षी, जलसंधारण, पावसाळ्यातील आरोग्याची काळजी तसेच शेती आणि पर्यावरणासाठी पावसाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. विविध कृती, प्रात्यक्षिके, चित्रप्रदर्शन, प्रश्नमंजुषा आणि संवादात्मक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या स्पेक्ट्रा नेचर फाउंडेशनच्या संचालिका सौ. सविता जगताप यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, पाणी बचत आणि निसर्गाशी मैत्री करण्याचा संदेश दिला. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी पावसाळ्यावरील गीते, घोषवाक्ये आणि लघु सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण शाळा परिसर पावसाळ्याच्या संकल्पनेनुसार आकर्षक सजविण्यात आला होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत झाली.
या कार्यक्रमास MTDK खाडे शैक्षणिक संकुलाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षकांनी केले असून विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे 'मान्सून दिवस' संस्मरणीय ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या