प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : विटा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत धडक कारवाई करत ५४४ ग्रॅम गांजासह एका संशयिताला अटक केली. या कारवाईत गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली असून, एकूण सुमारे ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव समीर अजमुद्दीन आत्तार (वय ४८, रा. माळी गल्ली, तासगाव) असे आहे. बलवडी गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, पथकातील पोलीस अंमलदार महेश संकपाळ यांना गोपनीय माहिती मिळाली की, तासगाव-कडेपूर मार्गाने एक व्यक्ती गांजा घेऊन कडेपूर बाजाराच्या दिशेने जाणार आहे. माहितीची खात्री करून पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे व पोलीस उपनिरीक्षक अभिजित कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरीचे टेक परिसरात सापळा लावण्यात आला.
यावेळी एमएच ११ सीव्ही १९७१ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून येणाऱ्या संशयिताला अडवून झडती घेतली असता, प्लास्टिक व वर्तमानपत्रात गुंडाळलेला ५४४ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ गांजा व मोटारसायकल जप्त करून आरोपीला अटक केली.
या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अंमली पदार्थांच्या विक्री किंवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या