प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदाणा सौद्यात शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केल्यानंतर आता बाजार समितीने दिलेल्या अधिकृत उत्तरामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.बेदाणा हा बाजार समितीच्या नियंत्रणा खालील शेतीमाल नसल्याने मार्केट कायद्यानुसार त्याच्या विक्रीसाठी स्वतंत्र नियम लागू करता येत नाहीत,' असे स्पष्टीकरण बाजार समितीच्या प्रभारी सचिवांनी मनसे नेते अमोल काळे यांना पत्राद्वारे दिले आहे. मात्र, राज्यभरात बेदाणा सौद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या तासगाव बाजार समितीकडूनच अशी भूमिका घेतली गेल्याने मनसेने तीव्र आक्षेप नोंदवत बाजार समितीवर जबाबदारी झटकण्याचा आरोप केला आहे.
मनसे नेते अमोल काळे यांनी बाजार समिती प्रशासनाला दिलेल्या निवेदनात बेदाणा सौद्यादरम्यान शेतकऱ्यांच्या मालाची मोठ्या प्रमाणावर उधळण होत असल्याचा गंभीर आरोप केला होता.गुणवत्ता तपासणीच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून प्रत्येक बॉक्समधून दोन ते तीन किलो बेदाणा खाली टाकला जात असून, हंगामभरात लाखो रुपयांच्या बेदाण्याचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच तूट,वजन,पेमेंट आणि व्यवहारातील पारदर्शकतेबाबत बाजार समितीने ठोस भूमिका घ्यावी,अशी मागणीही करण्यात आली होती.या निवेदनाला उत्तर देताना बाजार समितीने बेदाणा हा बाजार समितीच्या नियंत्रणातील अधिसूचित शेतीमाल नसल्याने त्यावर मार्केट कायद्याअंतर्गत नियंत्रण ठेवता येत नसल्याचे स्पष्ट केले.मात्र,त्याच पत्रात तासगाव बाजार समिती,सांगली बाजार समिती आणि शेतकरी संघटनांच्या संयुक्त बैठकीत बेदाणा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी धोरण निश्चित करण्यात आल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
याच मुद्द्यावरून मनसेने बाजार समितीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "एकीकडे बेदाणा आमच्या नियंत्रणाखाली नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे बेदाणा सौद्याबाबत धोरण ठरविण्यासाठी बैठका घ्यायच्या, ही नेमकी कोणती भूमिका?" असा संतप्त सवाल अमोल काळे यांनी केला आहे.तासगावचा बेदाणा सौदा हा केवळ तालुक्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे व्यापारी केंद्र मानले जाते.राज्याच्या विविध भागांतून शेतकरी आपला माल विक्रीसाठी तासगावमध्ये आणतात.अशा परिस्थितीत बाजार समितीनेच या व्यवहारांपासून हात झटकण्याची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढली आहे.
मनसेने आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे.जर बाजार समितीचा बेदाणा सौद्यावर कोणताही अधिकारच नसेल, तर तासगाव बाजार समितीच्या आवारात बेदाण्याचे सौदे नेमके कोणत्या नियमांच्या आधारे होतात? शेतकऱ्यांच्या मालाची तूट,पेमेंट, व्यवहारातील पारदर्शकता आणि वादांची जबाबदारी कोणाची? याचे स्पष्ट उत्तर बाजार समिती प्रशासनाने द्यावे,अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, राज्यभरात बेदाणा बाजारपेठ म्हणून नावाजलेल्या तासगाव बाजार समितीनेच "बेदाणा आमच्या नियंत्रणाखाली नाही" अशी भूमिका घेतल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मालाच्या व्यवहारांवर नियंत्रण कोणाचे, हा मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे केवळ कायद्याचा आधार न घेता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी बाजार समितीने आपली भूमिका स्पष्ट करावी,अशी मागणी अधिक तीव्र होत आहे.
"‘बेदाणा आमच्या नियंत्रणात नाही’ म्हणणे म्हणजे जबाबदारीपासून पळ काढणे!"
तासगाव बाजार समितीची राज्यभर ओळखच बेदाणा सौद्यामुळे आहे. अशा बाजार समितीच्या सचिवांनी "बेदाणा आमच्या नियंत्रणाखाली नाही" असे सांगणे धक्कादायक आणि हास्यास्पद असल्याची टीका मनसे नेते अमोल काळे यांनी केली. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्याऐवजी जबाबदारी झटकण्याचा हा प्रयत्न असून, बाजार समितीने याबाबत स्पष्ट आणि ठोस भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या