कवठेमहांकाळ प्रतिनिधी : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरनिरीक्षण मोहिमेत भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घेत निवडणूक आयोगाला सहकार्य करावे, असे आवाहन जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी केले. कवठेमहांकाळ तालुक्यातील बूथस्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या बीएलए-२ (Booth Level Agent-2) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते.
आमदार पडळकर म्हणाले की, राज्यभर सध्या मतदार यादीचे विशेष पुनरनिरीक्षण सुरू असून मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने आपल्या घरातील, नातेवाईकांतील, गावातील तसेच पक्षाशी संबंधित सर्व पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत की नाही, याची खात्री करून घ्यावी. ज्या पात्र नागरिकांची नावे राहिली आहेत, त्यांची नोंद करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत.
यावेळी त्यांनी मतदार यादीतील अपात्र, दुबार, परप्रांतीय अथवा संशयास्पद नोंदींबाबत योग्य त्या हरकती नोंदविण्याचे आवाहनही केले. "मतदार यादी शुद्ध आणि अचूक राहणे ही लोकशाहीची गरज आहे. या कामात प्रशासनाकडून अडचणी येत असतील तर कार्यकर्त्यांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता या मोहिमेत प्रभावीपणे सहभागी झाला पाहिजे," असे ते म्हणाले.
राजकीय संघटनाबरोबरच विकासकामांबाबतही आमदार पडळकर यांनी आश्वासन दिले. कवठेमहांकाळ तालुक्यातील विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले.
तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येईल, असे सांगताना ते म्हणाले की, तालुक्यातील सर्व तलाव भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. ज्या गावांपर्यंत अद्याप टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहोचलेले नाही, त्या गावांचा तातडीने सर्वेक्षण करण्यात येईल. यासाठी येत्या चार दिवसांत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक घेऊन पुढील नियोजन केले जाईल.
याशिवाय, कवठेमहांकाळ येथे स्वतंत्र प्रांत कार्यालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. "कवठेमहांकाळ तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या प्रत्येक अडचणीत पक्ष त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या मेळाव्यास भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक, जिल्हा सरचिटणीस अनिल लोंढे, ब्रह्मानंद पडळकर, तालुकाध्यक्ष उदय भोसले, तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्निल पाटील, मिलिंद कोरे, आझम मकानदार, धनंजय शिंदे यांच्यासह तालुक्यातील बीएलए-२ कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात आगामी निवडणुकांच्या दृष्टीने बूथ बळकटीकरण, मतदार नोंदणी आणि संघटनात्मक तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या