सांगली, प्रतिनिधी : सांगली शहरातील शामरावनगर परिसरातील महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित नगरसेवक आणि महापालिका प्रशासनाकडे मुरूम टाकून रस्ता तात्पुरता तरी दुरुस्त करण्याची मागणी केली. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
महादेव मंदिर परिसरात दररोज भाविक, ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी आणि वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, रस्त्यावरील खोल खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून लहान-मोठे अपघात वारंवार घडत आहेत. विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही आणि अपघाताचा धोका अधिक वाढतो.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, "आम्ही अनेक वेळा लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला रस्त्याच्या दुरुस्तीबाबत निवेदने दिली, तोंडी विनंत्याही केल्या. किमान मुरूम टाकून रस्ता वाहतुकीयोग्य करावा, एवढीच मागणी होती. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे."
या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या वेळी आश्वासने देतात; परंतु प्रत्यक्षात नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
नागरिकांनी महापालिका प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
स्थानिकांच्या मते, प्रशासनाने वेळेत उपाययोजना केल्यास संभाव्य अपघात टाळता येतील आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाचा दिलासा मिळेल.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या