जत प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त जत तालुक्यात पावसाने अद्यापही समाधानकारक हजेरी न लावल्याने ग्रामस्थांनी वरुणराजाला साकडे घालण्यासाठी एक अनोखी परंपरा जपली. जत तालुक्यातील वळसंग (सिद्धनाथ) येथे ग्रामस्थांनी विधीवत गाढवाचे लग्न लावून पावसासाठी प्रार्थना केली. लग्नानंतर नववधू-वर ठरवलेल्या गाढवांची गावातून वरात काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने ग्रामस्थांनी जल्लोष करत या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
महाराष्ट्रातील बहुतांश भागात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्येही मुसळधार पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र, दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्यात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याने शेतकरी चिंतेत असून खरीप पिकांवर संकट ओढवले आहे.
पावसाअभावी शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत चालला आहे. विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोतांतील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर गावातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामस्थांच्या सहभागातून गाढवाचे लग्न लावण्याचा पारंपरिक विधी पार पडला.
ग्रामस्थांच्या मते, गाढवाचे लग्न लावल्याने वरुणराजा प्रसन्न होतो आणि पावसाला सुरुवात होते, अशी अनेक वर्षांपासूनची लोकधारणा आहे. याच श्रद्धेतून गावकऱ्यांनी एकत्र येत हा अनोखा उपक्रम राबवला. लग्नाचे सर्व विधी पारंपरिक पद्धतीने पार पडले. त्यानंतर गाढवांना सजवून त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही उत्स्फूर्तपणे सहभागी झाली. ढोल-ताशांच्या तालावर ग्रामस्थांनी नृत्य करत वरुणराजाला पावसासाठी साकडे घातले.
दरम्यान, जत तालुक्यातील अनेक भागात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पेरणी केलेली पिके पाण्याअभावी करपण्याची भीती निर्माण झाली असून, लवकरच चांगला पाऊस झाला नाही तर शेतीबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पावसासाठी केलेल्या या अनोख्या परंपरेची सध्या परिसरात मोठी चर्चा रंगली असून, "वरुणराजा आता तरी प्रसन्न होऊन जतच्या भूमीवर मुसळधार बरसावा," अशीच प्रार्थना ग्रामस्थांकडून केली जात आहे.
यापूर्वी गावामध्ये अनेक असे गाढवाचे लग्न लावण्यात आलेले आहे. ही या गावची जुनीच परंपरा आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या