प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:लोकशाहीचे संस्कार बालपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात रुजावेत,मतदानाचे महत्त्व समजावे आणि जबाबदार नागरिक घडावेत या उद्देशाने सावळज (ता. तासगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयात प्रथमच आयोजित करण्यात आलेली 'वर्ग मुख्यमंत्री' निवडणूक शनिवारी अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि लोकशाही पद्धतीने पार पडली. प्रत्यक्ष विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीची अनुभूती देणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंतराव मांडके यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते प्रचार, आचारसंहिता,निवडणूक चिन्हांचे वाटप,गुप्त मतदान,मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या धर्तीवर काटेकोरपणे पार पाडण्यात आली.
विशेष म्हणजे,मतदानासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. त्यामुळे मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त राखली गेली.मतदान केंद्राची उभारणी, मतदार यादी,ओळख पडताळणी आणि गुप्त मतदानाची व्यवस्था यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव मिळाला.
या निवडणुकीतील मतदान अधिकारी,केंद्राध्यक्ष,मतदान प्रतिनिधी आणि इतर सर्व जबाबदाऱ्या विद्यालयाच्या ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अत्यंत जबाबदारीने पार पाडल्या.त्यामुळे नेतृत्वगुण,नियोजन क्षमता आणि संघभावनेचाही उत्कृष्ट प्रत्यय आला.या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यालयात शंभर टक्के मतदानाची नोंद झाली. मतदानानंतर तात्काळ मतमोजणी करून विजयी उमेदवारांना 'वर्ग मुख्यमंत्री' म्हणून घोषित करण्यात आले.त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच इतर उमेदवारांच्या सहभागाचेही कौतुक करण्यात आले.विद्यालयात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, मतदानाबाबत जागरूकता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना अधिक दृढ झाली. पालक व शिक्षकांनीही या प्रयोगाचे कौतुक करत, अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवनोपयोगी अनुभव मिळत असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष प्रवीण धेंडे,स्थानिक स्कूल कमिटीचे सुनील उर्फ दत्ता केडगे, संतोष कांचनकोटी,पालक प्रतिनिधी भाऊसो थोरात,विद्याधर घाट,पर्यवेक्षक शिंदे,सौ.एस.पी. पाटील यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी,पालक आणि विद्यालयाचा शिक्षकवृंद उपस्थित होता.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या