प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून देत रोटरी क्लब ऑफ तासगाव, इनरव्हील क्लब ऑफ तासगाव आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ तासगाव ग्रेप सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १९ जुलै) नगरपरिषद शाळा क्रमांक ७ आणि तासगाव पोलीस ठाणे परिसरात भव्य वृक्षारोपण अभियान उत्साहात पार पडले. "पर्यावरणासाठी एक झाड... भविष्यासाठी एक पाऊल!" या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात तब्बल ८० वृक्षांची लागवड करण्यात आली.
पर्यावरणाचा समतोल राखणे, वाढते प्रदूषण कमी करणे आणि भावी पिढीसाठी हरित वारसा निर्माण करणे हा या अभियानामागील मुख्य उद्देश होता.विविध प्रकारच्या सावली, फळ व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करून "एक झाड... पर्यावरणासाठी मोठे योगदान" हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.या मोहिमेला तासगाव नगरपरिषदेने जेसीबी व पाण्याची सुविधा उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले. तसेच तासगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेत पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली.या अभियानात रोटरी परिवारातील १८ रोटेरियन तसेच इनरव्हील, रोटरॅक्ट सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले. वृक्षारोपणानंतर झाडांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धारही उपस्थितांनी व्यक्त केला.
"हरित तासगाव... समृद्ध तासगाव!" हा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक जनजागृती झाली असून,अशा उपक्रमांमुळे तासगाव अधिक हिरवेगार करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे,असे आवाहन इव्हेंट चेअरमन रो.अभिजीत पवार आणि आयोजकांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या