कोल्हापूर (प्रतिनिधी) : निर्मिती प्रकाशन, प्रकाशित विसाव्या शतकातील समाजपटलावर आपल्या लेखणीच्या आणि वाणीच्या निखाऱ्यांनी प्रस्थापित विषमतावादी व्यवस्थेची जळमटे जाळून टाकणारे महानायक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे पुनर्मीलन घडवणारा 51 अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश असणारा तब्बल 700 पानांचा ‘मानवतावादी अण्णा भाऊ साठे’ हा कपिल राजहंस आणि मदन पवार संपादित महाग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवार दि. 2 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:30 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे.
अण्णा भाऊंना नव्याने समजून घेण्यासाठी सध्याच्या काळात वाचायलाच हवा असा मानवतावादी अण्णा भाऊ साठे हा 1500/- रुपयांचा महाग्रंथ फक्त 1000/- रुपयांमध्ये सर्वांना घरपोच मिळणार आहे किंवा निर्मिती प्रकाशन, 873, क/2, सी वॉर्ड, सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर, 9112472109, 9822472109 येथे उपलब्ध असणार आहे.
अण्णा भाऊ साठे हे केवळ एक साहित्यकार नव्हते, तर ते एका क्रांतिकारी सांस्कृतिक चळवळीचे ऊर्जास्त्रोत होते. मात्र, आजच्या काळात त्यांच्या साहित्याचे आणि विचारांचे पद्धतशीरपणे बंदिस्तीकरण केले जात आहे. अण्णा भाऊंच्या वैश्विक प्रतिभेचा हा अवमान रोखण्यासाठी आणि त्यांच्या खऱ्या 'मानवतावादी' रूपाची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी हा महाग्रंथ एक दिशादर्शक दस्तावेज ठरणार आहे.
या महाग्रंथात अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा, त्यांच्या मार्क्सवादी व आंबेडकरवादी विचारांच्या समन्वयाचा तसेच त्यांच्या जनवादी कलातंत्राचा सखोल वेध घेणारे लेख समाविष्ट आहेत. अनेक दिग्गज साहित्यिकांनी व विचारवंतांनी अण्णा भाऊंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या महाग्रंथातून उलगडले आहेत.
शाहीर दिलीप सावंत, उत्तमदादा कांबळे, अनिल म्हमाने, प्रा. किसनराव कुराडे, डॉ. डी. वाय. जमादार, भरत रसाळे, डॉ. अलोक जत्राटकर, अॅड. करुणा विमल, सुरेश केसरकर, डॉ. वैशाली चौगुले, राहुल सडोलीकर, विद्याधर कांबळे, संजयकुमार अर्दाळकर, अंतिमा कोल्हापूरकर, डॉ. वसंत भागवत, डॉ. अमोल महापुरे, प्रा. दादासाहेब ढेरे यांच्या उपस्थितीत होणार्या या प्रकाशन समारंभास साहित्यिक, कलावंत, विचारवंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. शोभा चाळके यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या