सांगली, प्रतिनिधी : सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका प्रभाग क्रमांक १६ मधील सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रिमिक्स काँक्रीट रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फुटपाथ उभारण्याच्या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ प्रसिद्ध विधीतज्ञ अॅड. जयसिंग (बाबा) पाटील यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
प्रभाग क्रमांक १६ च्या नगरसेविका अॅड. स्वाती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. संबंधित रस्ता यापूर्वी मंजूर झाला होता; मात्र निधीअभावी हे काम रखडले होते. निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांनी या ठिकाणी सुरक्षित व प्रशस्त फुटपाथची मागणी केली होती. नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत अॅड. स्वाती शिंदे यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेतला आणि अखेर कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी स्वाती शिंदे म्हणाल्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरात रक्तपेढी केंद्र, विविध दवाखाने, सोनोग्राफी केंद्रे तसेच दाट नागरी वस्ती असल्यामुळे या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात पादचारी व रुग्णांची ये-जा असते. त्यामुळे सुरक्षित पादचारी मार्गाची गरज नागरिकांकडून सातत्याने व्यक्त केली जात होती. या फुटपाथमुळे रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह ज्येष्ठ नागरिक, महिला व सर्वसामान्य पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या शुभारंभ प्रसंगी प्रभागाचे सहकारी नगरसेवक मयूर पाटील, नगरसेवक अमित शहा, माजी नगरसेवक तोफिक शिकलगार यांच्यासह परिसरातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व नागरिकांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत नगरसेविका अॅड. स्वाती शिंदे यांच्या पाठपुराव्याचे कौतुक केले आणि परिसराच्या विकासासाठी अशीच विकासकामे पुढेही सुरू राहावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या