सावळज : निसर्ग, साहित्य, संस्कृती, संगीत आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणारे निसर्गरंग फौंडेशन, सांगली आयोजित 'निसर्गराया भेटुया... चला, विठ्ठल पेरुया..!' या दहाव्या वर्षातील सायकल प्रवासासोबत सहावे निसर्गरंग साहित्य संमेलन २०२६ मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी स्वातंत्र्यसैनिक वि. स. पागे साहित्यनगरी, वडगाव (ता. तासगाव) येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
यंदाच्या साहित्य संमेलनाची संकल्पना "विनोद : एक गांभीर्य" ही असून, हसण्यामागील जीवनतत्त्वज्ञान, सामाजिक भान आणि माणुसकीची जपणूक यांचा वेध घेणारा हा अनोखा साहित्य सोहळा ठरणार आहे. "हसू हे क्षणिक... त्याचा अर्थ चिरंतन असतो; विनोद ही केवळ करमणूक नसून माणुसकी जपणारा गंभीर उत्सव आहे," हा संदेश या संमेलनातून दिला जाणार आहे.
संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मा. संजयदादा पाटील (माजी सभापती, पंचायत समिती तासगाव) तर उद्घाटक म्हणून मा. राहुल कदम (मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रायगड) उपस्थित राहणार आहेत. संमेलनाध्यक्ष म्हणून प्रख्यात कथाकथनकार मा. हिम्मत पाटील मार्गदर्शन करणार असून, ह.भ.प. तुकारामबाबा महाराज यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. निसर्गरंग फौंडेशनचे अध्यक्ष मा. कुलदीप देवकुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे.
या संमेलनात समाज, साहित्य, प्रशासन, पर्यावरण, पत्रकारिता, कला, उद्योग, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. प्रदीपकाका माने-पाटील, संदेश भंडारे, भीमराव धुळुबुळु, मुस्तफा मुजावर, राजेंद्र पोळ, वैभव चौगुले, अरुणनाना खरमाटे, आर. डी. (आप्पा) पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी "माझं आयुष्य आणि विनोद..!" या परिसंवादात ऋषिकांत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संजय काकडे, बालम पाचेगावकर, डॉ. प्रमोद काळे, रोहित कबाडे यांच्यासह विविध मान्यवर विनोदाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी पैलूंवर मनमोकळा संवाद साधणार आहेत. सूत्रसंचालन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर नितीन गवळी करणार असून स्वागत व प्रास्ताविक विरधवल पाटील करणार आहेत.
रात्री 'हास्यवारी' या मुक्तसंवाद कार्यक्रमात लेखक, दिग्दर्शक व अभिनेते प्रतिक साठे सूत्रसंचालन करणार असून, अध्यक्षस्थानी कवी अभिजीत पाटील असतील. कवी प्रा. संतोष काळे व कवयित्री वर्षा चौगुले सहभागी होणार आहेत. यावेळी ज्येष्ठ निवेदक व अभिनेते विजयदादा कडणे तसेच ज्येष्ठ कथाकथनकार प्रा. विश्वनाथ गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक-दिग्दर्शक शेखर रणखांबे, कोरिओग्राफर सुरज वाघमोडे, शशिकांत जाधव, सुमित साळुंखे, संदीपतात्या ठोंबरे आणि उद्योजक प्रगल्भ लोंढे यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.
संमेलनाच्या प्रारंभी शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण यांच्या "मन मराठी – सूर मराठी" या कार्यक्रमातून अभिजात मराठी भाषेच्या गौरवासाठी १०१ अजरामर मराठी गीतांचा सांगीतिक उत्सव सादर होणार असून, मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा अभिमान जागवणारा हा विशेष उपक्रम ठरणार आहे.
साहित्य, विनोद, संगीत, पर्यावरण आणि सामाजिक जाणिवांचा संगम घडविणाऱ्या या संमेलनास साहित्यप्रेमी, कलाकार, विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संमेलनच्या स्वागतध्यक्ष संजय दादा पाटील यांनी केले आहे.
"करूया पर्यावरणाचे रक्षण... होईल पृथ्वीचे संरक्षण. अजूनही वेळ गेलेली नाही; संरक्षण आणि संवर्धनच सर्वकाही!" या संदेशासह निसर्गरंग फौंडेशनचा हा सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम यंदाही समाजमनात नवा विचार पेरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या