सांगली प्रतिनिधी : नवभारत शिक्षण मंडळ, सांगली संचलित शांतिनिकेतन कन्या शाळा, सांगली येथे भावनिक एकात्मता कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या एकूण ३३ गरजू विद्यार्थिनींना शालेय फी, शालेय साहित्य, गणवेश (युनिफॉर्म) तसेच इतर आवश्यक शैक्षणिक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले.
शालेय समितीच्या अध्यक्षा डॉ. विजया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. महेश टोणपे यांच्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व १९८३ चे माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी यांच्या सहकार्याने हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. या माध्यमातून गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्याचा प्रेरणादायी प्रयत्न केला जातो.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून टोणपे कुटुंबीय तसेच सन १९७९ ते १९८३ च्या माजी विद्यार्थी बॅचचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शालेय समितीच्या अध्यक्षा डॉ. विजया चव्हाण यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी शाळेची शैक्षणिक, सांस्कृतिक व सर्वांगीण प्रगती उपस्थित पालक, विद्यार्थिनी आणि मान्यवरांसमोर मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एस. डी. मिरजे यांनी केले. पाहुण्यांची ओळख सौ. व्ही. व्ही. पाटील यांनी करून दिली, तर आभार प्रदर्शन सौ. एस. यू . मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन सौ. एस. एस. जाधव यांनी केले.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. समिता पाटील, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी, गरजू विद्यार्थिनींचे पालक तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम विद्यार्थिनींमध्ये सामाजिक बांधिलकी, सहकार्याची भावना आणि भावनिक एकात्मता दृढ करणारा ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या