नवी दिल्ली : भारत सरकारच्या केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित १७ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिल्ली येथे संसद भवन येथे पार पडले. यावेळी सांगली जिल्ह्यातील बुधगाव येथील ॲड.तेजस सन्मुख यांना 'संसदरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा राष्ट्रीय सन्मान देशाचे केंद्रीय कायदामंत्री तथा संसदीय कार्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उपक्रमाचे राष्ट्रीय परीक्षक तथा राज्यसभा सदस्य ब्रतिन सेनगुप्ता प्रमुख उपस्थित होते.
संसदीय लोकशाहीचे संस्कार, प्रभावी नेतृत्व, अभ्यासपूर्ण विचारमांडणी आणि ओजस्वी वक्तृत्व यांच्या बळावर सांगलीचे युवा विधिज्ञ ॲड.तेजस सन्मुख यांनी शिवाजी विद्यापीठाच्या संघाचे नेतृत्व करत राष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशाच्या राजधानीतील संसद भवनात आयोजित राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत त्यांनी साकारलेल्या प्रभावी पंतप्रधान भूमिकेची दखल घेत त्यांना युवा संसदेचा प्रतिष्ठेचा 'संसदरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ.रजनीश कामत यांनी विशेषत: त्यांचे अभिनंदन केले.
राष्ट्रीय युवा संसद उपक्रमात ॲड.तेजस सन्मुख यांनी भारताच्या पंतप्रधानांची भूमिका साकारत संसदीय कामकाजाचे नियम, कायदे निर्मिती प्रक्रिया, विरोधी पक्षांच्या प्रश्नांना दिलेली नेमकी उत्तरे, संसदीय शिष्टाचाराचे पालन आणि राष्ट्रीय प्रश्नांवरील परिपक्व भूमिका यांचे प्रभावी दर्शन घडविले. त्यांच्या ओजस्वी वक्तृत्वशैली, अभ्यासपूर्ण मांडणी, नेतृत्वक्षम व्यक्तिमत्त्व आणि संसदीय परंपरांवरील भक्कम पकडीमुळे उपस्थित मान्यवर, परीक्षक आणि सहभागी विशेष प्रभावित झाले. राष्ट्रीय एकात्मता, कृषी, महागाई, महिला सक्षमीकरण, विज्ञान व तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आदीसह अनेक विषयांवरील प्रश्नांना चोख उत्तरे दिली. विरोधकांच्या हरकतींवर त्यांनी सक्षम पर्याय बनून कायदे निर्मिती प्रक्रिया देखील यशस्वी केली. हा सन्मान केवळ वैयक्तिक यश नसून त्यांचे नेतृत्व, अभ्यास आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेल्या निष्ठेची राष्ट्रीय पातळीवरील पावती मानली जात आहे.
पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी भारतीय संसदीय लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी तरुणांनी संविधान, संसदीय परंपरा आणि राष्ट्रीय कर्तव्यभावना आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली. युवा संसद उपक्रम हा केवळ स्पर्धा नसून भावी नेतृत्व घडविण्याचा प्रभावी मंच असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय परीक्षक तथा राज्यसभा सदस्य ब्रतिन सेनगुप्ता यांनी ॲड.तेजस सन्मुख यांच्या पंतप्रधान भूमिकेतील आत्मविश्वास, प्रभावी संवादकौशल्य, विषयावरील सखोल अभ्यास आणि संसदीय नियमांच्या अचूक वापराचे विशेष कौतुक केले. संसदीय चर्चेचा दर्जा उंचावणाऱ्या त्यांच्या कामगिरीने परीक्षकांवर ठसा उमटविल्याचे त्यांनी नमूद केले.
ॲड.तेजस सन्मुख हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे विद्यार्थी असून सांगली जिल्हा न्यायालयात वकीली करत आहेत तसेच सांगली येथे विधी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी सामाजिक क्षेत्रातही अल्पावधीतच स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. संसद भवनात प्राप्त झालेला 'युवा संसदरत्न' हा राष्ट्रीय सन्मान त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला असून, महाराष्ट्रासाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, सहकारी, वकीलवर्ग, विद्यार्थी आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या