प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सेवेला आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीच्या प्रवासी भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, यापूर्वी लागू करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात झालेली वाढ, तसेच बसच्या सुट्या भागांचा, टायरचा आणि देखभाल-दुरुस्तीचा वाढलेला खर्च यामुळे महामंडळावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महामंडळाने सांगितले की, एसटीची आर्थिक शाश्वतता कायम ठेवणे, प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार व अखंड सेवा उपलब्ध करून देणे आणि भविष्यातील सेवा अधिक सक्षमपणे चालविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, यापूर्वी लागू करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात येणार असल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. नव्या दरानुसार एसटीचे भाडे १३.५६ टक्क्यांनी वाढणार असून सुधारित दर लवकरच लागू होणार असल्याचे महामंडळाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
महामंडळाने प्रवाशांना या निर्णयाबाबत सहकार्य करण्याचे आवाहन करत, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या