प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव शहरातील सिद्धेश्वर चौक परिसरातील सरस्वती आनंद हॉस्पिटलमधून एक दिवसाच्या नवजात पुरुष बाळाचे अपहरण केल्याप्रकरणी न्यायालयाने महिला आरोपीला दोषी ठरवत ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. स्वाती मच्छिंद्र पवार ऊर्फ स्वाती छबुराव माने (वय ३८) असे शिक्षा झालेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.दरम्यान,याच प्रकरणातील सहआरोपी मच्छिंद्र पवार याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास सरस्वती आनंद हॉस्पिटलमधून अवघ्या एक दिवसाच्या नवजात पुरुष बाळाचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. बाळाची आई हर्षदा शरद भोसले (रा. चिंचणी, ता. तासगाव) यांनी याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या फिर्यादीवरून तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९५/२०२२ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३, ३०८, ३४ तसेच बाल न्याय अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
*गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी लावला छडा*
घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सागर टिंगरे यांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणाचा महत्त्वपूर्ण छडा लावला. तपासादरम्यान स्वाती छबुराव माने ऊर्फ स्वाती मच्छिंद्र पवार हिच्यासह अन्य आरोपींची नावे समोर आली.स्वाती पवार हिचा संबंधित पत्ता राष्ट्रमाता इंदिरानगर विद्यालयाच्या पाठीमागे, सिद्धार्थ नगर, मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर, असा असून सध्या ती किर्लोस्करवाडी, ता. पलूस येथे राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तपास पूर्ण करून आवश्यक पुराव्यांसह प्रकरण न्यायालयात दाखल केले.
*न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल*
या प्रकरणाची सुनावणी सांगली येथील मा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. व्ही. निंबाळकर यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीअंती न्यायालयाने स्वाती मच्छिंद्र पवार हिला दोषी ठरविले.
भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ अंतर्गत तिला ७ वर्षांचा साधा कारावास व ३ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. तसेच बाल न्याय अधिनियमाच्या कलम ७५ अन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास सुनावण्यात आला.सदर शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असल्याने आरोपी महिलेला एकूण सात वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे.मात्र,याच प्रकरणातील सहआरोपी मच्छिंद्र पवार याची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
पोलिसांच्या तपासाला न्यायालयीन निकालाची जोड
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव यांनी केला.न्यायालयीन कामकाजासाठी अधिकारी सपोनि.मुहस्सर शेख यांनी काम पाहिले.सरकारी पक्षातर्फे ॲड. एम. बी. कुलकर्णी व ॲड. ए. एम. साटविलकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास व पुढील न्यायालयीन कार्यवाही करण्यात आली.अवघ्या एक दिवसाच्या बाळाच्या अपहरणाने चार वर्षांपूर्वी तासगाव शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करून आरोपीला न्यायालयीन शिक्षेपर्यंत पोहोचविण्यात पोलिसांना यश आले असून, न्यायालयाच्या निकालामुळे या गाजलेल्या प्रकरणाला अखेर महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या